एकाच जागेवर किंवा खुर्चीवर जास्त वेळ बसता? ठरू शकतं धोकादायक; वाचा महत्वाचं..

मुंबई:- कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आपल्याला एकाच जागेवर बसून अनेकदा काम करावं लागतं. याच ऑफिसमध्ये तासनतास आपल्या कॅम्प्युटरसमोर बसून अनेक जण काम करताना पाहायला मिळतात. मात्र, एकाच जागेवर खूप वेळ बसून काम करणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतं. यामुळे आपल्याला बऱ्याच आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्याबद्दल जाणून घेऊयात तसंच त्यावर उपाय काय आहेत हेसुद्धा माहिती करून घेऊयात.
१.कमरेचा किंवा पाठीचा त्रास-
एकाच जागेवर किंवा एकाच खुर्चीवर बराच वेळ बसल्यानंतर आपल्याला पाठ अवघडल्यासारखे वाटू लागते. यामुळे बऱ्याचदा पाठीचा त्रास जाणवू लागतो. रात्री झोपताना हा त्रास अधिक जाणवतो. त्यामुळे प्रत्येक तासाने आपल्या जागेवरून उठून आपल्या ऑफिसमध्ये एक फेरी मारून आपण पुन्हा जागेवर बसल्यास आपली पाठ काही काळ रिलॅक्स होऊ शकते.
२. मूळव्याधाचा त्रास:-
अनेकदा उष्णतेच्या कारणामुळे खूप जणांना मूळव्याधाचा त्रास जाणवू लागतो. मात्र,अशात एकाच जागी जास्त वेळ बसून राहिल्याने हा त्रास अधिक बळावू शकतो. त्यामुळे बसताना आपल्या खुर्चीवर एखादे मऊ कापडी आसन किंवा मण्यांची खुर्चीसाठी तयार करण्यात येणारी झालर याचा वापर करावा.
३. अपचन:-
कॉर्पोरेट जीवनात बऱ्याचदा नऊ तास काम करावे लागते. या वेळेत एकाच जागेवर बसून ते काम पूर्ण करावे लागते. अशावेळी आपण जेवण झाल्यानंतर खूप वेळ एकाच जागेवर बसून राहतो. यामुळे आपल्याला अपचनाचा त्रास जाणवू लागतो. त्यामुळे जेवण झाल्यानंतर काही वेळ चालणं फायदेशीर ठरू शकतं.
● उपाय:-
एकाच जागेवर बसल्यामुळे पाठीचा त्रास होत असल्यास सूर्यनमस्कार हा व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकतो. यामुळे संपूर्ण शरीर मोकळे होते व आपल्याला याचा लाभ होतो.
या सर्व गोष्टींची काळजी घेऊन एकाच जागेवर अधिक काळ बसणं टाळा आणि उत्तम आरोग्य लाभण्यासाठी व्यायाम करा.





