नवी दिल्ली

अनमोल बिश्नोईवर 10 लाखांचे बक्षीस जाहीर

नवी दिल्ली – कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तब्बल 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. यासोबतच तपास यंत्रणेने 2022 मध्ये एनआयएच्या दोन गुन्ह्यांमध्ये अनमोलविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले आहे. मुंबईत बाबा सिद्दीकीची हत्या करणारा शूटर अनमोल बिश्नोईच्या संपर्कात असल्याचे उघड केल्यावर एनआयएने ही कारवाई केली आहे. लॉरेन्सचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई उर्फ ​​भानू अमेरिकेत राहतो. तिथून तो लॉरेन्सच्या सांगण्यावरून गुन्हे करतो. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येप्रकरणीही अनमोल आरोपी आहे. गेल्या वर्षीही त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. बनावट पासपोर्टचा वापर करून तो भारतातून पळून गेला होता. तसेच तो सातत्याने आपले ठिकाणं बदलत राहतो. अनमोलवर सुमारे 20 गुन्हे दाखल असून त्याने जोधपूर तुरुंगात शिक्षाही भोगली आहे. त्याची 7 ऑक्टोबर 2021 रोजी सुटका झाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला हत्या झाली होती. या प्रकरणात देखील मुंबई पोलिसांनी अनमोलचा संबंध जोडला आहे. बाबा सिद्दिकीची हत्या करण्यापूर्वी शूटर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या संपर्कात होता. एवढेच नाही तर या तिन्ही आरोपींनी अनमोलशी स्नॅपचॅटच्या माध्यमातून बोलणे केल्याचा मुंबई पोलिसांचा दावा आहे.अनमोल बिश्नोई टोळी चालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. बेकायदेशीरपणे भारतातून पळून गेल्यानंतर अनमोल परदेशात राहतो आणि खंडणी, हवाला आदी कामे करतो, असे सांगितले जाते. यासोबतच टोळीतील सदस्यांसाठी पैसे आणि खर्चाची व्यवस्था करण्याची जबाबदारीही त्याच्यावर आहे. वृत्तानुसार, लॉरेन्सचे भाऊ अनमोल आणि सचिन टोळीच्या दैनंदिन कारवाया पाहतात, तर गोल्डी ब्रार जागतिक गुन्हेगारी सिंडिकेट चालवतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!