महाराष्ट्रमुंबई

राष्ट्रपुरुषांना जातीपातींच्या चौकटीत बंदिस्त करु नका ; ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी यांचे कळकळीचे आवाहन

मुंबई, दि, (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ही आपली दैवते आहेत. कृपा करून या आपल्या राष्ट्रपुरुषांना जातीपातींच्या चौकटीत बंदिस्त करून ठेवू नका. ही नररत्ने विश्व वंदनीय आहेत. छत्रपती मराठ्यांचे, फुले ओबीसींचे, आंबेडकर दलितांचे अशा पद्धतीने त्यांचे जातीनिहाय वर्गीकरण करु नका. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करु या, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी कळकळीचे आवाहन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राजाभिषेकानिमित्त बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील मागठाणे मित्र मंडळ संचालित कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. इच्छाशक्ती असेल तर काम कसे पूर्ण होऊ शकते हे गुजरात मधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती भव्य पुतळ्यावरुन दिसून येते. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाची घोषणा केली आणि ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. केवळ चार वर्षांत हे पूर्ण होऊ शकते परंतु २४ डिसेंबर २०१६ रोजी जलपूजन करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अरबी समुद्रातील भव्य स्मारक अजून पूर्ण होऊ शकले नाही. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मारके कधी पूर्ण होतील याची प्रतीक्षा राज्यातील जनतेला आहे, असेही योगेश वसंत त्रिवेदी यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे, महात्मा ज्योतिबा फुले हे ओबीसींचे, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे अशा जातीपातींच्या चौकटीत या राष्ट्रपुरुषांना बंदिस्त करून ठेवू नका, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रपुरुषांचा राजकारणासाठी वापर करण्यात येऊ नये, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती आणि राजाभिषेक या बद्दलचे वाद दुर्दैवी असल्याचे सांगतांना योगेश वसंत त्रिवेदी म्हणाले की, फाल्गुन वद्य द्वितीया ही छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जन्मतारीख, इंग्रजी दिनदर्शिके प्रमाणे १९ फेब्रुवारी आणि धर्मवीर आनंद दिघे हे ठाण्याला वेगळी साजरी करीत असत. यावरून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना विचारले असता ते म्हणाले की तीनच दिवस कां ? अरे, ३६५ दिवस महाराजांचा उत्सव साजरा करायला हरकत नाही. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहोचविले. जाणता राजा हे महानाट्य ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. अशा बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पोलिस बंदोबस्तात द्यावा लागतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल, असेही योगेश वसंत त्रिवेदी यांनी सांगितले. शिवभक्त राजू देसाई यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजाभिषेकाचा अभूतपूर्व, ऐतिहासिक प्रसंग आपल्या खड्या आवाजात कथन केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजाभिषेक करण्यात आला, राजावर अभिषेक म्हणून राजाभिषेक, हा अभिषेक राज्यावर नव्हे, असे स्पष्टीकरण शिवचरित्राचे अभ्यासक राजू देसाई यांनी केले.

मागाठाणे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. योगायोगाने राजू देसाई यांचा वाढदिवस असल्याने योगेश त्रिवेदी यांनी आणलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक नंदकुमार मोरे यांनी राजू देसाई यांना भेट देऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले. वसंत सावंत यांनी प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन केले. यावेळी मनोज सनांसे, सुभाष देसाई, दिलीप चव्हाण, हेमंत पाटकर, मनोहर देसाई, रेखाताई बोऱ्हाडे, कांचन सार्दळ, भावना कोरडे, सुरेखा देवरे, संजना वारंग, अभिलाष कोंडविलकर, दिलीप देसाई, संजय जोजन, अमित गायकवाड, मंगेश डेरे, नंदकिशोर शिवलकर, जयप्रकाश कोयंडे आदी जय महाराष्ट्र नगरातील तसेच बोरीवली पूर्व येथील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!