भुयारी मेट्रोत दिव्यांग प्रवाशांना मासिक पासमध्ये मिळणार 25 टक्के सवलत; 10 दिवसांत सुविधा सुरू होणार…

मुंबई : भुयारी मेट्रो-3च्या (आरे ते कफ परेड) मार्गावर दिव्यांग प्रवाशांना लवकरच मासिक ट्रिप पासवर 25 टक्के सवलत मिळणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने ही सुविधा येत्या 10 दिवसांत सुरू करण्याचे जाहीर केले असून, तिकीट प्रणालीत आवश्यक बदल करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या निर्णयामुळे मेट्रो 3 वर रोज प्रवास करणाऱ्या शेकडो दिव्यांगांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकल आणि लांबपल्ल्याच्या रेल्वेत 75 टक्के सवलत : मुंबईत बेस्ट बस आणि एसटीमध्ये दिव्यांगांना पूर्णपणे मोफत प्रवासाची सोय आहे, तर लोकल आणि लांबपल्ल्याच्या रेल्वेत 75 टक्के सवलत मिळते. मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 मार्गावरही दिव्यांगांना तिकिटात सवलत आहे. मात्र मेट्रो 3 च्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतरही दिव्यांगांसाठी कोणतीही सवलत नव्हती. ही बाब वारंवार चर्चेत येत होती. काही आठवड्यांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार तथा दिव्यांग हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे आरोग्यदूत दीपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून मेट्रो 3 मध्ये दिव्यांगांना सवलत देण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर मुंबई मेट्रो प्रशासनालाही सातत्याने पाठपुरावा केला. कैतके यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.
10 दिवसांत कार्यान्वित होणार : एमएमआरसीने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून ही माहिती दिली आहे. “दिव्यांग प्रवाशांसाठी मासिक ट्रिप पासवर 25 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तांत्रिक बदल पूर्ण झाल्यानंतर 10 दिवसांत ही सुविधा कार्यान्वित होईल,” असे एमएमआरसीने स्पष्ट केले. सवलत कशी मिळवायची, कोणत्या कागदपत्रांची गरज आहे, याची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.





