महाराष्ट्रमुंबई

धनंजय मुंडे प्रकरण : काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल, फडणवीस-पवारांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई प्रतिनिधी : संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येप्रकरणी राज्य सरकारवर चौफेर टीका होत असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सरकारकडे असलेले छायाचित्रे आणि व्हिडीओ पुरावे असूनही धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

“सरकारच्या कृत्यामुळे महाराष्ट्राची मान झुकली!” – हर्षवर्धन सपकाळ
या संदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “या क्रूर हत्येची छायाचित्रे पाहून महाराष्ट्रात आक्रोश उसळला आहे. सरकारकडे पुरावे असूनही धनंजय मुंडे यांना वाचवले जात होते. ही अत्यंत गंभीर बाब असून, या कृत्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने झुकली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सत्ता टिकवण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.”

“फक्त धनंजय मुंडेचा राजीनामा पुरेसा नाही”
सपकाळ यांनी सरकारवर घणाघाती टीका करताना “फक्त धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याने सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. त्यांना बडतर्फ का केले नाही?” असा सवाल उपस्थित केला. सरकारकडे सर्व पुरावे असूनही दोन महिने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, याचा अर्थ या टोळीला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

“जनतेच्या संघर्षामुळे सत्य बाहेर आले!”
संतोष देशमुख हत्या प्रकरण दडपण्यासाठी सरकारकडून प्रयत्न झाले असते, पण जनतेच्या संघर्षामुळे आणि माध्यमांच्या पाठिंब्यामुळे सत्य बाहेर आले. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपली कातडी वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा ढाल म्हणून वापर करत आहेत. मात्र, हे जनतेच्या लक्षात आले असून, त्यांनी सत्ता सोडली पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.

“सरकारचा कातडी बचाव प्रयोग यशस्वी होणार नाही!”
काँग्रेसने ही घटना सरकारच्या नाकर्तेपणाचे स्पष्ट उदाहरण असल्याचे सांगितले असून, फडणवीस-पवार सरकारवर अविश्वास दर्शवला आहे. सरकारने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला असला तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही नैतिक जबाबदारी स्वीकारून पायउतार व्हावे लागेल, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून लढा उभारेल, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!