क्राइमब्रेकिंग

धक्कादायक:अभ्यासासाठी तगादा लावल्याने सख्ख्या मुलीनेच घेतला आईचा जीव…

कराटेच्या कापडी पट्ट्याने गळा आवळून केला खून

नवी मुंबई :अभ्यास करण्यासाठी सतत तगादा लावणाऱ्या आईची मुलीनेच कराटेच्या कापडी पट्ट्याने गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे.

नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर-7 मध्ये राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीने आपल्या आईची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आईची हत्या केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी  मुलीने बेडरुमचा दरवाजा आतून बंद करुन आईच्या मोबाईल फोनवरुनच नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी खोलवर जाऊन तपास केल्यानंतर मुलीनेच आईचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.

सदर मुलीने दहावीत 92 टक्के गुण प्राप्त केले होते. या मुलीने पुढे खूप शिकून डॉक्टर व्हावे या साठी आई वडिलांनी या मुलीला वैद्यकीय प्रवेशासाठी लागणाऱ्या नीट परीक्षेची महागडी शिकवणी सुद्धा लावली होती. मुलीने स्वयंसिद्ध व्हावे म्हणून तिला कराटेचे धडे देखील दिले होते. मात्र,अति महत्वाकांक्षेपायी या पालकांनी मुलीच्या पाठी सतत अभ्यासासाठी तगादा लावल्याने आणि तो ताण आशय झाल्यानेच पोटच्या मुलीनेच आईला ठार मारले आहे.

मृत महिलेचे नाव शिल्पा जाधव (41) असून ती ऐरोली, सेक्टर-7 मधील राकेश सोसायटीत पती संतोष जाधव (44) आणि 15 वर्षीय मुलगी तसेच 6 वर्षांचा मुलगा यांच्यासह राहत होती. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे, अशी शिल्पा जाधव आणि संतोष जाधव या दोघांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी तिला गेल्या मे महिन्यापासून नीट परीक्षेच्या तयारीसाठी क्लास लावून दिला होता.
नीट परीक्षेच्या अभ्यासामध्ये मुलीने सातत्य ठेवावे यासाठी आई शिल्पा जाधव कायम आपल्या मुलीवर दबाव आणत होती. त्यामुळे मुलीचे आईसोबत अभ्यासावरुन नेहमी भांडण होत होते. 27 जुलै रोजी मुलीने मोबाईल घेतल्याने वडिलांकडून तिला ओरडा मिळाला होता. त्यामुळे ती रागावून जवळच राहणारे आपले मामा शैलेश पवार याच्या घरी गेली होती.
त्यानंतर सायंकाळी आई आपल्या मुलीची समजूत काढण्यासाठी भावाच्या घरी गेली असताना मुलीचा आपल्या आईसोबत पुन्हा वाद झाला.

या वादात मुलीने आई वडीलांविरोधात पोलिसात तक्रार करण्याची धमकी देखील दिली. त्यामुळे आईने मुलीला रबाळे पोलीस ठाण्यात नेले होते. त्यावेळी रबाळे पोलिसांनी मुलीची आणि तिच्या आई-वडिलांची समजूत काढून त्यांना घरी पाठवून दिले होते. त्यानंतर 30 जुलैला सकाळी या मुलीचे वडील घराबाहेर गेल्यानंतर घरामध्ये ती, आई आणि लहान भाऊ होते. यावेळी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आईने पुन्हा आपल्या मुलीला अभ्यासावरुन रागावून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.यामुळे मुलीला आईचा राग आला व तीने जोरदार प्रतिकार केला.
यावेळी आई आणि मुलगी या दोघींमध्ये झालेल्या झटापटीत मुलीने आईला ढकलून दिले. त्यामुळे आई खाली पडून तिच्या डोक्याला बेडरुममध्ये असलेला बेड लागला. त्यामुळे आई अर्धमेली होऊन पडल्यानंतर तिने बेडवर पडलेला कराटेचा कापडी बेल्ट हातात घेण्याचा प्रयत्न केला. पण, मुलीनेच तो बेल्ट आपल्या हातात घेऊन आईच्या गळ्याभोवती घट्ट आवळून धरत तिची हालचाल बंद होईपर्यंत तसाच धरुन ठेवला. यानंतर आई मेल्याची खात्री झाल्यावरच तिने आईला सोडले.आईची हत्या केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी मुलीने बेडरुमचा दरवाजा आतून बंद करुन आईच्या मोबाईल फोनवरुनच नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविला. मात्र तपासाअंती तिने गुन्ह्याची कबुली दिली.

दरम्यान पिढीमधील अंतराचा पालकांनी विचार केला पाहिजे. मुलाच्या भविष्याबाबत सतर्क असताना त्यांची आवड आणि क्षमता याचा विचार केला पाहिजे. आधुनिक युगातील मुलांचे भावविश्व समजून घेऊन त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्याच्या कलेने घेतले पाहिजे. जेणेकरुन मुलांमध्ये आणि पालकांमध्ये दुरावा निर्माण होऊन असे गुन्हेगारी कृत्य घडेल याची सर्व पालकांनी खबरदारी घेतली पाहिजे, असा सल्ला पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!