आमदार भातखळकरांच्या हस्ते ‘संजीवन समाधी सोहळ्या’चे उद्घाटन; कांदिवलीत तीन दिवस भजन-कीर्तनाची धूम!
मुंबई:संतपरंपरेचा महिमा जपणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा या तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमास आज (शनिवार, १५ नोव्हेंबर २०२५) कांदिवली (पूर्व) येथे भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.
श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा सांप्रदायिक संघ आणि स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दिंडी सोहळ्याने झाली सुरुवात
या सोहळ्याची सुरुवात संत श्री ज्ञानेश्वर चौक, कांदिवली (पूर्व) येथून काढण्यात आलेल्या भव्य दिंडी सोहळ्याने झाली. आमदार अतुल भातखळकर यांनी या दिंडी सोहळ्यात उपस्थित राहून वारकऱ्यांना प्रोत्साहन दिले. दिंडी यात्रेची समाप्ती सावित्रीबाई फुले मैदान, लोखंडवाला संकुल, कांदिवली (पूर्व) येथे झाली.
रांगोळीतून संत दर्शन सोहळ्याचे उद्घाटन
याच मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘रांगोळीच्या माध्यमातून संत दर्शन सोहळा’ याचे उद्घाटन आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना भातखळकर यांनी आयोजकांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. ते म्हणाले, “आपल्या सर्वांचे नक्कीच काही पुण्य असेल म्हणून आज आपण श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा’ या भव्य कार्यक्रमात विविध पद्धतीने योगदान देऊ शकलो.”
तीन दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा (१५ ते १७ नोव्हेंबर)
दिनांक: १५, १६ व १७ नोव्हेंबर २०२५ (कार्तिक वद्य त्रयोदशी) या काळात सावित्रीबाई फुले मैदान येथे खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:
• भव्य भजन स्पर्धा
• भक्ती संगीताचा कार्यक्रम
• रांगोळीच्या माध्यमातून संत दर्शन सोहळा
आमदार भातखळकर यांनी नागरिकांना कुटुंबासह या संतपरंपरेच्या अद्वितीय उत्सवात सहभागी होण्याचे आणि भक्ती, सेवा व सद्भावना व्यक्त करण्याचे आवाहन केले.
या सोहळ्याला श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा सांप्रदायिक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळ तसेच कांदिवली मतदारसंघातील पदाधिकारी-कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पसायदान आणि आरतीने कार्यक्रमाला समारोप झाला.





