अंधेरीच्या साकिनाका येथे विसर्जन मिरवणुकीला गालबोट, विसर्जन मिरवणुकीत वीजेचा धक्का; 5 भाविक होरपळले, एकाचा मृत्यू!

मुंबई: अंधेरीच्या साकिनाका येथे विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. विसर्जन मिरवणूकीच्या ट्रॉलीला उच्चदाव वीज वाहिनीच्या वीज वाहक तारेचा स्पर्श झाला. यावेळी ट्रॉलीत असलेले ५ भाविक होरपळले. त्यात एकाचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री १ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साकिनाका येथे श्री गजानन मित्र मंडळ आहे. शुक्रवारी रात्री अनंत चतुदर्शीच्या दिवशी मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली होती. रात्री ढोलताशांच्या गजरात मिरवणूक खैराणी रस्त्यावरून जात होती. मध्यरात्री एकच्या सुमारास ही मिरवणूक एसजे स्टुडियोसमोर आली. त्या ठिकाणी उच्चदाबाची वीज वाहक तार लोंबकळत होती. त्या तारेचा स्पर्श विसर्जन ट्रॉलीला झाला. त्यामुळे वीजेचा धक्का लागून ट्रॉलीवर असलेले ५ जण होरपळले. या घटनेमुळे एकच गोंधळ झाला. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकाचा मृत्यू दोन मुलांसह ४ जखमी
या दुर्घटनेत ट्रॉलीवर असलेला बिनू शिवकुमार (३६) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य जखमींमध्ये तुषार गुप्ता (१८), धर्मराज गुप्ता (४४), शंभू कामी (२०) तसेच आरुष गुप्ता (१२) आणि करण कानोजिया (१४) या दोन मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेनंतर मंडळावर शोककळा पसरली आहे. साकीनाका परिसरात टाटा कंपनीच्या उच्चदाब वीज वाहिनीच्या वीज वाहक तारा मोठ्या प्रमाणात आहेत. यापूर्वीदेखील वीजेचा धक्का लागून जीवितहानी झाल्याचे सांगत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रथमदर्शनी उच्चदाब वीज वाहिनाच्या तारेचा धक्का लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यात एका भाविकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती साकिनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल यादव यांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. चौकशीनंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असेही त्यांनी सांगतिले.