मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर

मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी 9 जून रात्री 11 वाजता ही दुर्घटना घडली. मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे.
बचावकार्य सुरु
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 17 जणांना आतापर्यंत सुखरुप बाहेर काढलं आहे. मात्र अद्याप अजून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. तसेच अद्याप काही जण या ढिगाऱ्याखाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या दुर्घटनेतील जखमींना कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
Visuals of search & rescue operation by Fire brigade in a building collapse at Malvani Gate No 8,Malad (W) last night.
A portion of 2nd & 3rd floor of a Gr.+ 3 residential building collapsed on adjacent G+1 floor chawl injuring 17 people. Unfortunately 9 reported dead so far pic.twitter.com/x9dYx5vmOa
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 10, 2021
मुसळधार पावसामुळे दुर्घटना – असलम शेख
मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्याशिवाय या इमारतीचा ढिगारा उपसून त्यात काही जण अडकले आहेत का याचाही शोध सुरु आहे.
घटनास्थळी एकच खळबळ
स्थानिकांच्या मते, ही संपूर्ण दुर्घटना रात्री 11 च्या सुमारास घडली. यात सुरुवातीला एक दुमजली घर कोसळले. यानंतर एकापाठोपाठ एक अशी तीन घर कोसळली. यातील एका घरात 7 जण राहत होते. त्यातील 5 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या इमारतीच्या अगदी विरुद्ध दिशेला आणखी दोन इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे.