महाराष्ट्र

मराठा आरक्षण: शाहू महाराजांनी राज्यातील खासदारांना दिला ‘हा’ सल्ला!

कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत नेला पाहिजे असं मत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केलं आहे. केंद्राने हा विषय मनावर घेतला आणि आपल्या बाजूने मांडायचं ठरवलं तरच हा प्रश्न सुटू शकतो असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे, अजित पवार मोदींनी सकारात्मकता दाखवली असल्याचं म्हटलं असलं तरी अद्यापही त्यांचे काय विचार आहेत समजलेलं नाही असं यावेळी त्यांनी म्हटलं. मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात झाली आहे. यावेळी ते बोलत होते.

“हा विषय पंतप्रधानांपर्यंत नेला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांनी त्यांच्यासमोर विषय मांडला आहे. पंतप्रधान सकारात्मक असल्याचं सांगण्यात आलं असलं तर अद्याप त्यांचे विचार काय आहेत हे कळालेलं नाही. ते स्पष्ट झालं तर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात येईल. बहुमत असल्याने त्यांच्याकडे जाऊन सोबत येण्यासाठी विनंती केली पाहिजे,” असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.

कायद्यात बदल करण्यास काय अडचण आहे?
“केंद्राने हा विषय मनावर घेतला आणि आपल्या बाजूने मांडायचं ठरवलं तरच हा प्रश्न सुटू शकतो,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. कायद्यात आतापर्यंत इतके बदल झाले असताना आणखी एक बदल करण्यास काय अडचण आहे ? अशी विचारणा करताना मनात आणलं तर सगळं होऊ शकतं असं त्यांनी सांगितलं.

दिल्लीत लॉबिंग करणं गरेजचं
“महाराष्ट्राने एकत्र येऊन आमदार, खासदारांनी हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तो कसा न्यायचा यावर विचार केला पाहिजे. संभाजीराजेंना दिल्लीत पोहोचवण्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. एकट्यावरच जबाबदारी टाकणं आणि त्याने सर्व करणं अशक्य आहे. त्यामुळे खासदार आणि मंत्रीमंडळाने दिल्लीत विषय पोहोचवला पाहिजे. तसंच फक्त मोदींकडे विषय मांडून चालणार नाही. पंतप्रधान म्हणतील मी काय करु, बाकीच्यांचं मत काय माहिती नाही, असं चालणार नाही. बहुमतासाठी लॉबिंग करावं लागेल,” असंही ते म्हणाले आहेत.

दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न
“गेल्या काही वर्षात ५८ मूक मोर्चे आणि मुंबईतील भव्य मोर्चा शांततेने पार पडले. जनतेमध्ये, समाजात नाराजी असल्याचं मी पाहत होतो. एकमुखाने विषय हाताळण्यापेक्षा एकमेकांच्या विरोधात बोलण्याचं तसंच दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु होते. संभाजीराजेंनी रायगडावरुन गर्जना केल्यानंतर आम्ही त्यांना भूमिका थोडी बदलली पाहिजे, सौम्य पद्धतीने आणि सर्व समाजाला सोबत घेऊन काम केलं पाहिजे असं सांगितलं. महाराष्ट्राने एकमुखाने पुढे गेलं पाहिजे याच दृष्टीकोनातून हे मूक आंदोलन करण्यात आलं,” असं ते म्हणाले.

सगळंच मिळेल अशी अपेक्षा करु नका
अजित पवार यांनी भेटीदरम्यान मांडण्यात आलेले मुद्दे रास्त असून योग्य विचार करु असं आश्वासन दिलं होतं अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. राज्य सरकार आपल्यासोबत असणार आहे यात मला शंका वाटत नाही असंही यावेळी त्यांनी स्पष्ट करताना सगळंच मिळेल अशी अपेक्षा करु नका असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. जे शक्य आहे आणि योग्य आहे ते जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर मिळणं हा मुख्य प्रश्न आहे असं ते म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!