लवकरच शाळा, कॉलेज, लोकलबाबत निर्णय घेऊ; मंत्री विजय वडेट्टीवारांचा इशारा

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवायला सुरूवात केली असून रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसून येत आहे. त्यातच महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असल्याने ठाकरे सरकारने कठोर पाऊलं उचलण्याचा विचार सुरु केला आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही निर्बंध लावले जाऊ शकतात असा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जर महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढली तर तीच स्थिती इथे निर्माण होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चाही झाली आहे. ते निर्बंधाबाबत निर्णय घेतील. यात एक पर्याय म्हणजे राज्यात काही ठिकाणी कन्टेन्मेंट झोन करुन तिथे प्रवेश बंदी केली जाईल. गर्दी होणार नाही त्याची दक्षता घेण्यात येईल. रेल्वेत जी गर्दी होतेय त्यावरही मुख्यमंत्री गंभीर आहेत,तसंच परिस्थिती पाहून लवकरच शाळा,कॉलेज,लोकलबाबत निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु झालं आहे. कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्राच्या उंबरठयावर आहे. रुग्णसंख्या १० हजारांवर पोहचली आहे. मुलांचे लसीकरण लवकर व्हावं यासाठी प्रशासन सज्ज आहे. कुठलाही विद्यार्थी लसीकरणातून सुटणार नाही अशी मोहिम हाती घेतली आहे. जेवढ्या लसी प्राप्त होतील ते पाहून पालकांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.






