
रत्नागिरी (प्रतिनिधी) सावरकर नाट्यगृहात आपण या पुढे पुन्हा पाय ठेवणार नाही असे सांगत प्रेक्षकांची जाहीर माफी मागणाऱ्या भरत जाधव यांच्या वक्तव्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
भरत जाधव यांनी या गोष्टीचे उगाचच भांडवल करत त्याचा इव्हेंट करायचा कि एपिसोड करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. मी इकडे येणार नाही मी तिकडे येणार नाही म्हणून कोणतीही चळवळ काही थांबत नाही, अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी भरत जाधव यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
ते पुढे म्हणाले की, सावरकर नाट्यगृहात कोणत्या त्रुटी असतील तर त्या नक्कीच दूर केल्या जातील संयोजकांनी तीन तासाचे डिझेल टाकल्यानंतर ते चार तास कसे पुरेल. नाटक किती वेळ चालवायचे हा संयोजकांचा प्रश्न आहे. ज्यावेळेला आपण खातू नाट्यगृहात शो करत होतो त्या वेळेला तुम्हाला कुठेही जायची तयारी होती, अशा स्वरूपाचा एका नाट्यरसिकाचा लेख आपण वाचला. आता वि.दा.सावरकर नाट्यगृहात अतिशय चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. भरत जाधव यांच्या नाटकाच्या आधी तीन दिवस मी त्याच ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांबरोबर कार्यक्रमासाठी होतो त्यावेळेला एसी चा कोणताही त्रास आम्हाला झाला नाही. त्यामुळे आहे त्यापेक्षा उगाचच काहीतरी मोठे झाले आहे, असा आविर्भाव आणणे योग्य नाही अशा शब्दात उदय सामंत यांनी सुनावले आहे.
मीही सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्ष काम करत आहे आपण या सगळ्या लोकांना अनेक वर्ष बघत आहे. भरत जाधव मला कॉल करून बोलू शकले असते. त्यासाठी त्यांना असा इव्हेंट करण्याची आवश्यकता नव्हती पण तो शेवटी त्यांचा प्रश्न आहे. भरत जाधव यांनी माफी मागताना मला वाटलं त्यांनी प्रेक्षकांच्या तिकिटाचे काही पैसे परत दिले असतील असाही टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.






