कोकणातील गुहागर येथून सोडण्यात आलेल्या बागेश्री कासवाने एक हजार किमीचा प्रवास करत गाठले केरळ…

रत्नागिरी (प्रतिनिधी): ऑलिव्ह रिडले कासवांच्या अभ्यासाच्या दुसऱ्या टप्प्यात रत्नागिरीतील गुहागर येथून सोडण्यात आलेले बागेश्री कासव एक हजार किमीचा प्रवास करत थेट नागरकोईलला (केरळ) पोचले आहे. कासवाचा पुढील प्रवास तामिळनाडू असेल की, पुढे खोल समुद्राकडे याकडे अभ्यासकांचे लक्ष आहे; मात्र दुसर्या ‘गुहा’ कासवाचा वेग मंदावला असून, ते मंगळूरच्या जवळ खोल समुद्रात रेंगाळत आहे. याला कासव अभ्यासक सुरेशकुमार यांनी दुजोरा दिला आहे.
जागतिक सागरी कासव दिनाचे औचित्य साधून देशभरात सगळीकडेच संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत. कोकणात दरवर्षी ऑक्टोबर ते मे या कालावधीत ऑलिव्ह रिडले कासव अंडी घालण्यासाठी येतात. त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी मँग्रोव्ह फाउंडेशन, महाराष्ट्र वनविभाग, भारतीय वन्यजीव संस्था यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. गेली दोन वर्षे कासव टॅग करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यात दोन कासवांना सॅटेलाइट टॅग करून गुहागर येथून समुद्रात सोडले होते. त्यांच्या प्रवासावर पूर्ण लक्ष ठेवले जात आहे. सॅटेलाईट टॅगिंग केलेल्या दोन कासवांपैकी बागेश्रीने सुरवातीला मुंबईची दिशा धरली होती. तेथून माघारी वळून बागेश्री दक्षिणेकडे केरळच्या दिशेने प्रवास करू लागले. त्या पाठोपाठ गुहा कासवही होतेच. पहिल्या टप्प्यात सोडलेल्या कासवांपैकी तिघांचा प्रवास कर्नाटकपर्यंतच झाला होता. तिथेच त्यांचा संपर्क तुटला. दुसऱ्या टप्प्यातील दोन्ही कासंवापैकी बागेश्री वेगाने ३ राज्यांच्या सिमेतून प्रवास करत पुढे सरकत आहे. लक्ष्यद्विपीय शेल्फ पाण्यातून बागेश्री पुढे मार्गक्रमण करत आहे. आतापर्यंतच्या अभ्यासामधील निरीक्षणातून कासवांच्या फिरण्याचे क्षेत्र अरबी समुद्रात कर्नाटकपर्यंत असल्याचा अंदाज मांडण्यात आला होता. या ठिकाणी त्यांना मुबलक खाद्य मिळत असावे, अशीही पुष्टी जोडली गेली होती; परंतु बागेश्री कासव कर्नाटक ओलांडून केरळच्या टोकाला पोचल्याने नवीन काहीतरी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्येही ऑलिव्ह रिडले कासवं अंडी घालण्यासाठी येतात. त्यामुळे बागेश्री तिकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे गुहा कासव कर्नाटक किनारपट्टीच्या खोल पाण्यात शिरली असून, तिथेच डुबकी घेत आहे.






