सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेतल्या सत्तांतरानंतर राणे समर्थकांनी मुख्य सभागृहातील बाळासाहेबांचा फोटो हटवला

सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सत्तांतरानंतर मुख्य सभागृहातील व्यासपीठावर असलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो हटवण्यात आला आहे. त्याजागी आता फक्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचाच फोटो लावण्यात आला आहे. या प्रकारामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून राणेंवर टीकेची झोड उठत आहे.
शिवसैनिक संतोष परब मारहाणी प्रकरणानंतर चर्चेत आलेली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीनंतर नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हटवल्यानंतर सिंधुदुर्ग मधील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लवकरात लवकर पुन्हा एकदा बाळासाहेबांचा फोटो आहे त्या जागी लावण्याची मागणी शिवसैनिकांनी उचलून धरली आहे.
ज्यांच्यामुळे नारायण राणे राजकारणामध्ये येऊ शकले,त्याच बाळासाहेबांचा फोटो राणे समर्थकांनी हटवल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं राजकारण सध्या तापलं आहे.आता याचे राज्यात काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.