मुंबईमहाराष्ट्रराजकीय

लाट नाही तर त्सुनामी आली असं वाटतंय- उद्धव ठाकरे

मुंबई :  महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला निकाल पूर्णपणे अनाकलनीय, अनपेक्षित वाटतो. त्यामुळे आजचा निकालाचा अभ्यास करावा लागेल. हा निकाल कसा लागला, हे कळायला मार्ग नाही. लाट नाही तर त्सुनामी आली असं वाटतंय. लोकसभेनंतर अवघ्या पाच महिन्यांत असं यांनी काय काम केलंय? असा प्रश्न उपस्थित करत महायुतीच्या जिंकलेल्या उमेदवारांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे. महायुतीच्या जिंकलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करताना मी कद्रूपणा दाखवणार नाही. जिंकलेल्यांचे अभिनंदन करतो. परंतु लाटेपेक्षा त्सुनामी आली, हे निकालाने दिसतंय. निकाल सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. निकालानंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महायुतीच्या यशावर विचारले असता ठाकरे म्हणाले , परंतु ज्यांना निकाल पटला नाही, त्यांनी घाबरून जावू नये. आम्ही राज्यातील जनतेच्या भल्यासाठी संघर्ष करू. यावेळी तरी अस्सल भाजपचा कुणीतरी मुख्यमंत्री होईल, असा टोमणा ठाकरे यांनी लगावला.

जनतेला निकाल मान्य नसेल तर आम्ही त्यांना सांगतो, आम्ही लढत राहू, आम्ही तुमच्यासोबत राहू. महायुतीचे सरकार येण्यात लाडकी बहीण योजनेचा वाटा असल्याचे बोलले जाते, असे विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महागाई, बेरोजगारी वाढते आहे, महिला असुरक्षिततेचा मुद्दा होता. यावर जनतेने मतदानच केले नाही का? मविआचे काय चुकलं? असे विचारले असता, आम्ही प्रामाणिकपणे वागलो ही आमची चूक झाली की काय? असे वाटायला लागले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र माझ्याशी असं वागेल, असे वाटले नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा घोषणा भारतीय जनता पक्षाने दिलेल्या होत्या. निवडणूक झाली आहे. आता त्याची पूर्तता करण्याची वेळ आलीये, अशी आठवण ठाकरेंनी करून दिली.

आजच्या निकालाने सरकारला अधिवेशनात एखादे बील मांडायची गरजच नाही, असे वाटते. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते, एकच पक्ष राहिल. आजचा निकाल पाहून यांची तिकडेच वाटचाल दिसते आहे. राज्यात आम्ही प्रचारसभा घेतल्या. लोकांचा मूड पाहिला. मग सोयाबीनला भाव मिळत नाही, बेरोजगारी वाढली आहे, महिला सुरक्षेचा प्रश्न आहे, म्हणून लोकांनी असा निकाल दिला का? एवढी त्सुनामी कशी आली, याचे गुपित शोधावे लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!