नव्या काद्यांची आवक वाढल्याने पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना ६० कोटी रुपयांचा फटका
नाशिक : पूर्ण देशामध्ये कांद्याच्या असलेल्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नव्याने लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. लासलगाव जिल्ह्यातील प्रमुख १५ बाजार समितीमध्ये दररोज दोन ते अडीच लाख क्विंटलची कांद्याची आवक होत असल्याने गेल्या पंधरा दिवसांमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ६० कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याने परदेशात निर्यात होणाऱ्या कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवा, तसेच गेल्या पंधरा दिवसांमध्ये विक्री झालेला कांदा व विक्री होणाऱ्या कांद्याला प्रतिक्विंटलला दोन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आता कांद्याचे भाव सातत्याने कोसळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झालेली आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना 60 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळच्या सत्रात ९०० वाहनातून १५ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली या कांद्याला जास्तीत जास्त २,३०० रुपये, कमीतकमी ७०० रुपये तर सरासरी १,५०० रुपये इतका दर मिळाला. दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने कांदा उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली असून हा असंतोष आता बाहेर पडायच्या मार्गावरती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांदा प्रश्नावरून नाशिक जिल्ह्यात मोठे आंदोलन होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.