वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर एनआयए कडून अटक
मुंबई,दि.१४: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासी इमारतीसमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडण्याच्या प्रकरणात शनिवारी उशिरा रात्री एक मोठी घडामोड घडली. या प्रकरणात संशयाची सुई असणारे मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर एनआयए कडून अटक करण्यात आली आहे. शनिवारी तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना रात्री पावणेबारा च्या सुमारास अटक करण्यात आली.
मुंबईतील अंबानी यांच्या निवासस्थाना नजीक स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो गाडी अलीकडेच सापडली होती. या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह त्या नंतर काही दिवसांनी मुंब्रा खाडीत सापडला होता.दरम्यान हिरेन यांच्या पत्नीने या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचाच हात असल्याचा आरोप केल्यानंतर प्रकरणाने गंभीर वळण घेतले होते. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील सीडीआर संभाषण मिळवून थेट सचिन वाझे यांच्या अटकेची जोरदार मागणी केली होती. त्यानंतर सदर तपास हा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ने आपल्या ताब्यात घेत काल सुमारे १३ तास सचिन वाझे यांची चौकशी केली होती. अखेर चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान अशी माहिती समोर येते आहे की, स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणाच्या कटात ५-७जणांचा समावेश असून या चौकशीत NIAच्या हाती काहीतरी सबळ पुरावा लागल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.