महाराष्ट्रमराठवाडा

सोमनाथ सुर्यवंशींची हत्या करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करुन गुन्हे दाखल करा, सरपंच हत्येतील गुन्हेगारांवरही कठोर कारवाई करा: नाना पटोले

परभणीत कोंबिंग ऑपरेशनचे आदेश मंत्रालय व पोलिस महासंचालकांच्या कार्यालयातून कोणी दिले त्याची चौकशी करून कारवाई करा

मुंबई: परभणी व बीड प्रकरणी पोलिसांच्या मदतीने लोकांचे जीव घेतले गेले. परभणीतील आंबेडकरी अनुयायी सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांच्या मारहणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सरकारने अजून त्या पोलिसांवर कठोर कारवाई केलेली नाही. संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीत कोंबिंग ऑपरेशन करून निरपराध लोकांना बेदम मारहाण करण्यात आली. या कोंबिंग ऑपरेशनचे आदेश कोणी दिले? मंत्रालय व पोलीस महासंचालक कार्यालयातून आदेश दिले गेले का? याची चौकशी करून कोंबिंग ॲापरेशन करणारे अधिकारी व त्यांना आदेश देणा-यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी या निरपराध सुशिक्षित तरुणाचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळेच झाल्याची पुष्टी शवविच्छेदन अहवालानेही केली असताना राज्य सरकार अद्याप संबंधित पोलिसांना पाठीशी घालत आले आहे. सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाला अशी खोटी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात देऊन सभागृहाची दिशाभूल केली. आता सरकार याच प्रकरणी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करत आहे. सुर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार नाहीत तर मग सरकार त्यांना निलंबित का करत आहे असा प्रश्न विचारून फक्त निलंबित करून चालणार नाही तर त्यांना बडतर्फ केले पाहिजे. विधानसभेत खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस हक्कभंग आणणार आहे, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या या अत्यंत गंभीर घटना आहेत. दोन्ही प्रकरणात सरकार चालढकल करत आहे. बीड प्रकरणात भाजपाचे आमदार सुरेश धस दररोज नवीन सनसनाटी आरोप करत आहेत. पण सरकार काहीच कारवाई करत नाही. यावरून

हे सर्व ठरवून सुरु आहे असे दिसते. आता त्यांनी परभणी प्रकरणात पोलिसांना माफ करण्याची भाषा केली आहे. हा दुटप्पीपणा असून तो फक्त सुरेश धस यांचा नसून सरकारचा दुटप्पीपणा आहे. सरकार सुरेश धसांना बुजगावण्यासारखे उभे करून मुळ प्रश्नापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
कृषी विभागातील भ्रष्टाचारावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारच्या काळात कृषी विभागाने भ्रष्टाचाराचे विक्रम केले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी परस्पर गायब केला. कापूस खरेदी पिशव्या असो वा नॅनो युरिया खरेदी असो, शेतकऱ्यांच्या योजना केवळ कागदावर राहिल्या. शेतकऱ्यांच्या योजनांसाठी डीबीटी पद्धतीचा वापर केला जात असताना त्याला बगल देऊन कृषी विभागाने घोटाळे केले. कृषी विभागातील भ्रष्टाचाराला फक्त कृषी विभागातील अधिकारी व कृषी मंत्रीच जबाबदार नाहीत तर तत्कालीन मुख्यमंत्री व राज्य सरकारही तितकेच जबाबदार आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राहुल सोलापुरकरला आवरा !
भारतीय जनता पक्ष महापुरुषांचा निवडणुकीत मतांसाठी वापर करते व सत्तेत आल्यानंतर त्यांचा अवमान करते हे आपण मागील काही वर्षांपासून पहात आलो आहोत. भाजपाचे डझनभर नेते मंत्री यांनी महापुरुषांचा अपमान केला तसेच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही अवमान केला. भाजपा सरकार असताना असे प्रकार होत असतात, आता अभिनेता राहुल सोलापूरकर जाणीवपूर्वक महापुरुषांचा अवमान करत आहे. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मागील आठवड्यातच अपशब्द वापरून सोलापूरकर याने अवमान केला, त्यानंतर त्याने माफी मागितली आणि आता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राहुल सोलापूराने गरळ ओकली आहे आणि माफी मागण्याचे नाटकही केले. राहुल सोलापुरकर याच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी जेणेकरून पुन्हा कोणी महापुरुषांचा अपमान करण्याची हिम्मत करणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांच्या एका शिष्टमंडळाने आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या व व्यथा मांडल्या. संसदेत अंगणवाडी सेविकांचा प्रश्न उपस्थित करून न्याय देण्याची विनंती या शिष्टमंडळाने राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करून न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्नासन राहुल गांधी यांनी दिल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!