“दहावीची परीक्षा स्वामींच्या मठात बसून दिली होती” – पालकमंत्री उदय सामंत

संत शिरोमणी श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्यानिमित्त, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, क्षेत्र नाणीज धाम, रत्नागिरी येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित होते. यावेळी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांनी उदय सामंत ह्यांचा सन्मान केल्याबद्दल उदय सामंत ह्यांनी महाराजांचे मनःपूर्वक आभार मानले. जेव्हा जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांच्या मठाच्या बांधकामाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हा पहिला चिरा आमच्या सामंत कुटुंबीयांच्या वतीने लावण्यात आला होता. याचा मला सार्थ अभिमान आहे. तसेच, माझ्या आईच्या सांगण्यावरून मी दहावीची परीक्षा स्वामींच्या मठात अभ्यास करून दिली होती, याचीही यावेळी आठवण झाली.
स्वामींच्या आशीर्वादाने दहावीचा पेपर दिला आणि पुढे राजकारणात दर पाच वर्षांनी येणारा ‘पेपर ही स्वामींच्या आशीर्वादाने डिस्टिंक्शनने उत्तीर्ण होत असल्याचा उल्लेख यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केला. स्वामींचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज हिंदू धर्माच्या उन्नतीसाठी आणि धर्मसंवर्धनासाठी अपार सेवा करत आहेत. त्याबद्दल मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. माझ्या रत्नागिरी मतदारसंघाचे नाव स्वामींच्या कृपेने संपूर्ण जगभर पोहोचले आहे, याचा मला आनंद आहे. स्वामींनी केवळ आशीर्वादच दिले नाहीत, तर माझ्या मतदारसंघात रोजगाराच्या संधी निर्माण करून समाजसेवेचे महान कार्यही केले आहे.
तसेच, जगभर स्वामींच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट सामाजिक कार्य सुरू आहे, याचा मला अभिमान वाटतो, असे यावेळी उदय सामंत ह्यांनी म्हटले.या कार्यक्रमास जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज, कानिफनाथ महाराज, कॅबिनेट मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण भैया सामंत, रत्नागिरी टाइम्सचे संपादक उल्हास घोसाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.