संगमेश्वरच्या कसबा येथे संभाजी महाराज स्मारकासाठी सक्तीचे भूसंपादन शक्य

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे ही शिवभक्तांची इच्छा आहे. स्मारकाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेणार आहे. गरज पडल्यास सक्तीने भूसंपादन केले जाईल, असा इशारा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरूवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. कदम यांनी कसबा येथील संभाजी स्मारक परिसराची पाहणी केली. त्यानंतर साडवली येथील रत्नसिंधु निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी कदम म्हणाले, स्मारकासाठी माजी आमदार डॉ. सुभाष बने, रोहन बने, राजेंद्र महाडीक, स्थानिक आमदार शेखर निकम, भाजपचे प्रमोद जठार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मूळ अडचण आहे ती जागेची. स्मारकाची जागा ही खाजगी मालमत्ता आहे. त्याठिकाणी भूसंपादनाचे प्रश्न आहेत. जागा मालकांशी चर्चा केली जाणार असून पाहणी दरम्यान या जागेची मोजणी झालेली नसल्याची बाब पुढे आल्याचे कदम यांनी सांगितले.