जेनेरिक औषधांमुळे रुग्णांच्या पैशांची बचतः खा. अशोकराव चव्हाण

मुंबई प्रतिनिधी: जेनेरिक औषधांचा दर्जा उत्तम असून, त्यांच्या किंमतीही कमी आहेत. सर्वसामान्य गरीब कुटुंबांना मदत व्हावी आणि उपचार स्वस्त व्हावेत, यासाठी २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनऔषधी योजना सुरू केली होती. ही योजना अतिशय लोकोपयोगी असून, जेनेरिक औषधांच्या वाढत्या उपलब्धतेमुळे रुग्णांच्या पैशांची बचत होत असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.

जनऔषधी दिनानिमित्त त्यांनी आज मुंबईच्या कामा हॉस्पिटल परिसरातील सुपारीबाग मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघ संचालित जेनेरिक औषधांच्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राला भेट दिली. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. या भेटीप्रसंगी हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे, सुपारीबाग ग्राहक संघाचे अध्यक्ष किशोर देसाई, केंद्र संचालक संतोष चन्ना, प्रधानमंत्री जनऔषधी योजनेच्या समन्वयक हेमांगी नेगी आदी उपस्थित होते. खा. चव्हाण यांनी या भेटीत केंद्र संचालकांशी, डॉक्टरांशी तसेच रुग्णांशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले की, या योजनेमध्ये सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध व्हावीत आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी मागील ११ वर्षात देशातील ७६८ जिल्ह्यांमध्ये १५ हजारांहून अधिक प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे उघडण्यात आली आहेत. ⁠पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये दरवर्षी ७ मार्च रोजी जनऔषधी दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून हा दिवस आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जनऔषधी दिवस म्हणून साजरा केला जातो. रुग्णांनी जेनेरिक औषधांचा वापर वाढवावा, असे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले. 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!