महायुती सरकारचा अर्थसंकल्प – फसवे आश्वासने आणि दिशाभूल करणारी आकडेमोड!
मुंबई प्रतिनिधी : महायुती सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ स्वप्न विकणारा असून, त्याला कोणताही वास्तवाधार नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केला. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने सरकार पाळत नाही, यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे “गाजर दाखवायचं आणि तोंडाला पाने पुसायची” अशी अवस्था असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांसाठी केवळ फसवी ग्वाही
कर्जमाफीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. निवडणुकीपूर्वी संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले, मात्र आता त्यावर मौन पाळले जात आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव आणि सरकारी खरेदीबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही. पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना भरपाई मिळेल की विमा कंपन्यांना फायदा हे अद्याप स्पष्ट नाही.
महिलांच्या योजनांचा फसवा गाजरा
महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी मातेले यांनी केली. “लाडकी बहिण” योजनेच्या अंमलबजावणीसाठी अटी वाढवल्या, पण प्रत्यक्ष पैसे मिळण्याची शाश्वती नाही. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना सरकार मूग गिळून गप्प बसल्याचा आरोप त्यांनी केला.
तरुणांसाठी रोजगार नव्हे, फक्त थापा!
तरुणांना मोठी आश्वासने दिल्यानंतरही सरकारी नोकरभरतीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. रोजगार निर्मितीचा बट्ट्याबोळ करत सरकारने युवकांना दिशाभूल करणारे गाजर दाखवले आहे. शिक्षण क्षेत्रासाठी निधी कमी केला जात असताना जाहिरातींसाठी अब्जावधी रुपये खर्च करण्यात आले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली.
उद्योग गुजरातला, महाराष्ट्रात मात्र जाहिरातींचा गाजावाजा
महाराष्ट्रात नवे उद्योग येण्याऐवजी मोठ्या गुंतवणुकी गुजरातला वळत आहेत. महायुती सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी भरीव पावले उचलण्याऐवजी फक्त आश्वासनांचा पाऊस पाडला आहे.
आरोग्य आणि मूलभूत सुविधांकडे सरकारचे दुर्लक्ष
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे सध्या ओस पडली असून, सरकारी रुग्णालयांमध्ये औषधसाठा अपुरा आहे. मंत्र्यांसाठी खासगी रुग्णालयांची सुविधा आहे, मात्र सामान्य जनतेला उपचारांसाठी वणवण भटकावे लागत आहे.
पाणी, वीज, रस्ते – सगळ्यांची दुर्दशा!
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आजही अनेक गावांमध्ये प्यायला पाणी नाही, वीज पुरवठा खंडित होतो, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हे सरकारच्या अपयशाचे मोठे उदाहरण असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले.
जनतेला थापा, श्रीमंतांना लाभ!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मते, महायुती सरकार हा “शब्द मोठे पण कृती शून्य” अशा धोरणावर चालतो. गरीब आणि कष्टकरी जनतेला हक्काच्या योजनांपासून दूर ठेवले जात असून, बड्या उद्योजकांना मात्र मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या जात आहेत.
“हा अर्थसंकल्प म्हणजे महायुती सरकारच्या अपयशाचा लेखाजोखा आहे. आता सरकारला जबाबदारीला लावण्याची वेळ आली आहे,” असे ॲड. अमोल मातेले यांनी म्हटले.