मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही बांद्रेकरवाडीतील भू-माफियांवर कारवाई नाही – प्रविण दरेकर

मुंबई प्रतिनिधी : जोगेश्वरीतील बांद्रेकरवाडीत भूमाफियांनी बेकायदेशीररित्या जागा हडपल्याचा गंभीर प्रकार घडला असून, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही, असा गंभीर आरोप विधान परिषदेत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. त्यांनी सरकारकडे या प्रकरणाची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आज विधान परिषदेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे हा मुद्दा उपस्थित करत दरेकर म्हणाले, “मुंबईत जबरदस्तीने जागा हडपण्याचे प्रकार वाढले आहेत. जोगेश्वरीतील शुक्ला नावाच्या भूमाफियाने बांद्रेकरवाडीतील दुसऱ्याच्या जमिनीवर रात्री ३ वाजता पत्रे ठोकून अतिक्रमण केले.”
या संदर्भात त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. मात्र, अपेक्षित कारवाई न झाल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने पोलीस उपायुक्त गुंजाळ यांना अशा प्रकारच्या दादागिरीवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलिसांकडून दुर्लक्ष?
दरेकर यांनी आरोप केला की, “मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराजसिंह बोरसे आणि पोलीस अधिकारी शिंदे यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून, सरकारने त्वरित या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.”
या प्रकरणावर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर देताना आश्वासन दिले की, “मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही जर कारवाई होत नसेल, तर ते चुकीचे आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.”
या प्रकरणामुळे मुंबईतील भू-माफियांच्या वाढत्या कारवायांवर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता सरकार आणि पोलीस प्रशासन या प्रकरणी कोणती पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.