मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार…
अंशतः लॉकडाऊन बाबत करणार महत्वाची घोषणा ?
मुंबई, दि.२ मुंबई सह राज्यातील वाढणाऱ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी ८.३० वाजता जनतेशी दृकश्राव्य माध्यमातून संपर्क साधणार आहेत.
राज्यात लॉकडाऊन करावयाचा की फक्त कठोर निर्बंध लागू करायचे यावर सरकार मधील तिन्ही पक्षांमध्ये एकमत होताना दिसत नाही. मुख्यमंत्री स्वतः तसेच शिवसेना पक्ष हा लॉकडाऊन लावण्याच्या मनःस्थितीत आहे. मात्र काँग्रेस पक्ष लॉकडाऊन लावण्याच्या विरोधात आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप, संजय निरुपम यांनी संपूर्ण लॉकडाऊन करण्याला विरोध दर्शविला आहे. तर राष्ट्रवादी चे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील अलीकडेच लॉकडाऊन लावल्याने गरीब व मध्यमवर्गीय लोकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकेल असे मत व्यक्त केले होते. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लॉकडाऊन लावायला हरकत नसल्याचे म्हटले होते.
विरोधी पक्ष भाजप हा देखील संपूर्ण लॉकडाऊन च्या विरोधात असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी लॉकडाऊन लागू केल्यास रस्त्यावर उतरून विरोध करू असे सांगितले आहे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी लॉकडाऊन ला प्रखर विरोध करत लॉकडाऊन लावायचा असेल तर आधी गरीब व सर्वसामान्य जनतेच्या खात्यात पाच हजार रुपये जमा करावेत असे सरकारला सुनावले आहे.