सरकार आणि महाराष्ट्र पोलीस दलाला आव्हान देणाऱ्या इराणी वस्तीची दहशत मोडून काढा -प्रविण दरेकरांची शासनाकडे मागणी

मुंबई– आंबिवली स्थानकाला लागून असलेल्या इराणी वस्तीत पोलिसांवर जीवघेणे हल्ले सातत्याने होत आहेत. महाराष्ट्र पोलीस आणि सरकारला आव्हान देणाऱ्या या इराणी वस्तीची दहशत मोडून काढावी, अशी मागणी आज भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत सरकारकडे केली.
दरेकर म्हणाले कि, कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर आंबिवली रेल्वे स्टेशनला लागून इराणी वस्ती असून आतापर्यंत दहा ते बारा वेळा या वस्तीमध्ये पोलिसांवर जीवघेणे हल्ले झालेले आहेत. रॉकेल ओतून पोलिसांचा जीव घेण्याचा प्रकार झाला, दगडफेक झाली, महिलांआडून गुन्हेगारांना पळूण जाण्यास मदत करण्यात आली आहे. इराणी वस्तीत गेलेल्या पोलिसांवर हल्ले झाल्याचे प्रकार नवीन राहिलेले नाहीत. एकटा दुकटा पोलीस या वस्तीत जाऊ शकत नाही. इराणी टोळीला कायद्याची भिती आणि वर्दीचा धाक राहिलेला नाही. कायद्याच्या रक्षकांवरच सातत्याने हल्ला होत आहे. खतरनाक गुंडांचं निवासस्थान, लपण्याची जागा म्हणून इराणी वस्ती ओळखली जाते. यावेळी दरेकर यांनी २०१३ ते २०२४ पर्यंत पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटनांचा दाखलाही सभागृहात दिला.
तसेच ते म्हणाले कि, आंबिवलीच्या इराणी वस्तीत पोलिसांवर जीवघेणे हल्ले झाल्याच्या अनेक घटना आहेत. या राज्यात कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. एक वस्ती जर महाराष्ट्र पोलिसांना म्हणजेच सरकारला आव्हान देत असेल तर यापेक्षा वाईट कोणती गोष्ट असू शकत नाही. महाराष्ट्र पोलिसांना, सरकारला आव्हान देणारी इराणी वस्तीची दहशत कायमची मोडून काढण्यासाठी केवळ आंबिवली पोलीस नाही तर महाराष्ट्र पोलीस म्हणून कोणती ठोस कारवाई सरकार करणार ? ही वस्ती अनधिकृत असेल तर रितसर कारवाई करुन या वस्तीतील अनधिकृत बांधकामे बुलडोझर लावून सरकार तोडणार का ? तसेच बाहेरील राज्यातील गुंड वापरात नसलेल्या झोपडपट्टी, इमारतीत आश्रय घेतात. सरकारने शोधमोहीम घेऊन यांना शोधून काढावं, अशी मागणीही दरेकरांनी केली.
यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले कि, दीड ते दोन हजार लोकांची इराणी वस्ती आहे. या संपूर्ण वस्तीत कोम्बिंग ऑपरेशन केले जाईल. जिथे जिथे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर मोक्का सारखी कारवाई केली जाईल. तसेच जिथे अनधिकृत बांधकामे आहेत तिथे योग्य ती कारवाई केली जाईल. ज्या अनधिकृत इमारती आहेत त्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेऊ. अनेक परदेशी नागरिकांनी गुन्हे केलेत, त्यांच्यावर कारवाईही केलीय. याबाबत कडक भुमिका घेऊन परदेशी नागरिकांवर बंधने कशी आणता येईल, याचा विचार केला जाईल.