मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण बनतेय एक्सीडेंट स्पॉट: मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी घेतलाय धसका…

मुंबई ,(महेश पावसकर) :राज्याचे प्रशासकीय मुख्यालय अर्थात मंत्रालय हे नेहमीच काही ना काही वेगळ्याच घटनांमुळे चर्चेत असते.आपल्या मागण्या मान्य होत नसल्याने कधी कुणी मंत्र्यांच्या केबिन समोर विष पितो तर कुणी दुसर्या किंवा तिसर्या मजल्यावरून त्रिमूर्ती प्रांगणातील जाळ्यावर उड्या मारतो. याच त्रिमूर्ती प्रांगणात मुख्यमंत्री आणि सचिव योग दिनी योगाचे धडे घेतात तर बर्याच वेळा विविध ग्रामीण स्वयं सहायता गटाचे पदार्थ विक्रीचे स्टॉल लागतात.
अश्या या गजबजलेल्या त्रिमूर्ती प्रांगणात वर्दळ कमी झाल्यावर उशिरा संध्याकाळी-रात्री कामासाठी थांबलेल्या कर्मचार्यांना काही दिवसांपासून विचित्र अनुभव येऊ लागले आहेत त्यांना अचानक अपघातांना सामोरे जावे लागत आहे.चालता चालता अचानक पाय घसरतो आणि पडणारी व्यक्ति जबरदस्त जखमी होते. इतकेच काय त्या व्यक्तीला त्वरित दवाखान्यात दाखल करावे लागते. आतापर्यंत सुमारे अकरा कर्मचारी/पत्रकार याच स्पॉट वर पडले असून कुणाचा हात तुटला तर कुणाचे नाक फुटले आहे.
सध्या अन्न आणि औषध प्रशासन मंत्री असलेले व माजी विधानसभा उपाध्यक्ष असलेल्या नरहरी झिरवाळ यांनी आदिवासींच्या काही मागण्यांसाठी या खेपेस आमदार म्हणून निवडून आल्यानंतर याच त्रिमूर्ती प्रांगणात लावलेल्या जाळीत उडी मारली होती.त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यात आल्याने या उडीची विशेष चर्चा झाली होती. असे हे त्रिमूर्ति प्रांगण सध्या विचित्र अपघातानंतर पुन्हा चर्चेत आले असून प्रांगणातील ‘त्या’ विशिष्ट जागेवरून जायला कर्मचारी कचरत आहेत.
मंत्रालय-विधिमंडळ वार्ताहर संघाचे एक ज्येष्ठ सदस्य प्रथम येथे रात्री 8 च्या दरम्यान चालता चालता अचानक पडले आणि त्यांच्या नाकातून व ओठातून रक्तस्त्राव सुरू झाला त्यांना लगेचच दवाखान्यात भर्ती करण्यात आले. त्यानंतर एक महिला कर्मचारी देखील जबरदस्त जखमी झाल्या. अलीकडेच माहिती आणि जनसंपर्क विभागातील एक कर्मचारी पडून त्याचा उजवा हात मोडला. अधिक माहिती घेतली असता आतापर्यंत चक्क 11 कर्मचारी या प्रांगणातील विशिष्ट जागी पडून जबरदस्त जखमी झाले आहेत.
मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे आतापर्यंत 11 व्यक्ति त्रिमूर्ति प्रांगणातील ‘त्या’ विशिष्ट जागी पडून देखील प्रशासनाकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यातच शासनाच्या प्रसिद्धी विभागातील कर्मचारी जबर जखमी होऊन देखील माहिती खात्याने त्याची दखल घेतलेली नाही. सर्वसामान्य कर्मचारी, पत्रकारांकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन एखादा मंत्री किंवा सचिव येथे पडल्यावर जागे होणार काय? अशी चर्चा सध्या मंत्रालयात सुरू आहे.