महाराष्ट्रमुंबई

२३२ प्रवाशांसह तिसरे विमान दाखल; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढील प्रवासासाठी बसेस सज्ज

मुंबई : महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन मुंबईत दाखल झाले. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई होईल.

दरम्यान, काल दोन विशेष विमानांनी 184 प्रवासी महाराष्ट्रात परतल्यानंतर तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन महाराष्ट्रात पोहोचले. ही तीन विमाने मिळून महाराष्ट्रातील 416 पर्यटक परत आले, तर अन्य माध्यमातून आतापर्यंत सुमारे 800 प्रवासी परत आले आहेत. याशिवाय, सुमारे 60 ते 70 आणखी पर्यटकांच्या विनंती प्राप्त झाल्या असून, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करून देण्यात येत आहे. जसजशा विनंती प्राप्त होतील, तसे त्या पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!