महाराष्ट्रकोंकण

कणखर वक्ता आमदार भास्कर जाधव यांचा भावनिक पैलू समोर

 रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा आक्रमक व कठोर स्वभावाचे दर्शन अनेक वेळा होते अनेकदा राजकीय मंडळींनाही त्यांचा प्रत्यय आलेला आहे. त्यांचा स्वभाव रोखठोक बोलण्याचा आहे. ते कणखर आहेत, पण तेही किती हळवे पण आहेत हे एका प्रसंगाने सर्वांसमोर आले.

गुहागर तालुक्यातील पांगारी गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गेल्या 8 वर्षांपासून कामाला होती. आपला मनमिळावू स्वभाव आणि प्रामाणिकपणामुळे तिने जाधव कुटुंबातील सर्वांचेच मन जिंकले. विशेष म्हणजे आमदार भास्कर जाधव यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीसुद्धा तिला स्वतःच्या मुलीप्रमाणेच प्रेम दिले. त्यामुळे तिचे लग्न ठरल्यानंतर मुलीप्रमाणेच सर्व काही करून तिला तिच्या घरी पाठवले होते. लेकीची पाठवणी करताना बापमाणूस जसा डोळ्यातून पाणी काढतो. तसेच अश्रू या मानलेल्या लेकीची पाठवणी करताना भास्कर जाधवांच्या डोळ्यात तरळले.

भास्कर जाधव यांच्याकडे घरकाम करणाऱ्या सुप्रियाचे काल लग्न होते, त्यासाठी सर्व कार्यक्रम पुढे ढकलून आमदार जाधव हे पत्नी, मुले, पुतणे, सुनांसह लहानशा पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले. लग्न लागलं.. सात फेरे झाले. त्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा भास्करराव जाधव यांचा कंठ दाटून आला. सुप्रियाने पत्नी सौ. सुवर्णाताई आणि सून सौ. स्वरा यांना कडकडून मिठी मारली आणि ती रडू लागली. आपुलीच्या नात्यांमधून तयार झालेल्या या प्रेमाचा हळवा क्षण पाहताना उपस्थितांचेही डोळे पाणावले. तेव्हा, सुप्रियाला बापाचं प्रेम देणान्या भास्कर जाधवांच्याही अश्रूंचा बांध फुटला. डोळ्यातील रुमाल काढत त्यांनी आपले अश्रू पुसले. तसेच, स्वतःला सावरत त्यांनी मुलाला आणि तिच्या सासरच्या मंडळींना बापाच्या नात्याने सांगितले की, सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे तर माझी मुलगीच आहे. ती लक्ष्मी आहे. तुमच्या घराची ती नक्कीच भरभराट करेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या’ असाही प्रेमळ सल्ला दिला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!