रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर भारत जिंदाबाद यात्रा चे आयोजन; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मुंबईत घोषणा
मुंबई / रमेश औताडे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना चांगला धडा शिकवला याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारी दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारतीय सैन्याने हाती घेतलेल्या सिन्दुर ऑपरेशनच्या यशाबद्दल रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मुंबईत प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे निरपराध भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून २८ जणांची क्रूर हत्या केली. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने सिन्दुर ऑपरेशन करून पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांची ठिकाणे उध्वस्त करून १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार केले.याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.असे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्या प्रमाणे नेमके हेरून दहशतवादी ठिकाणे उध्वस्त केली. दहशतवाद्यांना धडा शिकवला. भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्य दाखवून देशाचे संरक्षण करून शत्रू राष्ट्र पाकिस्तान ला चांगलाच धडा शिकवला. भारताचे दहशतवादाविरुद्ध युद्ध कायम राहील भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे असे त्यांनी सांगितले.
भारत जिंदाबाद यात्रा रिपब्लिकन पक्ष देशभर काढणार आहे. येत्या २२ मे ते ६ जून पर्यत देशभरात सर्व राज्यांत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात रिपब्लिकन पक्ष भारत जिंदाबाद यात्रा हाती तिरंगा ध्वज घेऊन काढण्यात येणार आहे अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी ही भारत जिंदाबाद यात्रा आप आपल्या भागात यशस्वी करावी. रिपब्लिकन पक्षाने आयोजित केलेल्या या भारत जिंदाबाद यात्रेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आठवले यांनी केले आहे.






