मांडवी एक्सप्रेसमधील चोरीचा प्रकार; एका महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम एकूण 1 लाख 4 हजार 450 रुपयांचा ऐवज चोरीला

चिपळूण : चिपळूण रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मांडवी एक्सप्रेसमधून एका महिलेच्या हॅन्डबॅगेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४ हजार ४५० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १९ मे २०२५ रोजी दुपारी ४.४५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी चिपळूण रेल्वे पोलिसांत भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला १९ मे रोजी गाडी क्रमांक १०१०४ अप मांडवी एक्सप्रेसच्या एस-३ बोगीतील सीट क्रमांक ७६ मध्ये चढल्या. यावेळी त्यांच्या हॅन्डबॅगेतील पाऊचमध्ये ठेवलेले ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ३५०० रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन, फिर्यादीच्या संमतीशिवाय व अप्रामाणिकपणे लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. या चोरीमध्ये १ लाख ९५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ३५०० रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या घटनेची फिर्याद २१ मे रोजी दुपारी १२.०५ वाजता दाखल करण्यात आली असून, पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.