अवकाळी पावसाचा सिंधुदुर्गला बसला जबरदस्त फटका… आपत्कालीन यंत्रणा झाली नापास…बैठकीत पालकमंत्री कडाडले…. सर्वांचीच केली झाडाझडती…!
सिंधुदुर्गनगरी(प्रतिनिधी)-सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस अवकाळी पावसाने अक्षरशःधुमाकूळ घातला. वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि एकूणच आपत्कालीन यंत्रणा नापास झाली. अखेर पालकमंत्री नितेश राणे यांना जिल्ह्यात धाव घेत आपत्कालीन यंत्रणेची बैठक घ्यावी लागली. तब्बल दीड तास चाललेल्या बैठकीत त्यांनी सर्वांचीच चांगली हजेरी घेत झाडाझडती केली.वीज वितरण, बांधकाम, बीएस एन एल च्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले.अखेर अवकाळी पाऊस केव्हाही येऊ शकतो,इथून पुढे अशा नैसर्गिक संकटाला तोंड देण्यासाठी आपण अगोदरच तयार राहिले पाहिजे.कमीत कमी नुकसान होईल या दृष्टीने अगोदरपासूनच सज्ज राहिले पाहिजे असं सुचवत आतापासूनच सर्वांनी ‘अलर्ट मोड’ वर रहा असं आवाहन त्यांनी सर्वसबंधित यंत्रणा आणि सिंधुदुर्गवासियांना केले.
अवकाळी पावसानंतर जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आज संपन्न झाली.
या बैठकीला जिल्हाधिकारी अनिल पाटील,जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.माणिक दिवे, प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी स्वाती साठे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीश राऊत,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिश दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील संभाव्य पावसाळी संकटाला तोंड देण्यासाठी सर्वसंबंधित यंत्रणानी सज्ज रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सर्व प्रमुख विभागांनी आपापले नियंत्रण कक्ष स्थापन करावेत तसेच लोकांना त्वरीत संपर्क साधता यावा यासाठी वृत्तपत्रे व मीडिया मध्ये फोन नं.जाहीर करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे हे लक्षात घेऊन स्वच्छता मोहीम हाती घ्यावी अशा सूचना त्यांनी सर्वसबंधित यंत्रणाना दिल्या.
राणे यांनी वीज वितरण कंपनी,’बीएसएनएल’, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभागांच्या अधिकाऱ्यांची यावेळी चांगलीच झाडाझडती केली. कामात कुचराई, हलगर्जीपणा केल्यास आपण खपवून घेणार नाही असे खडेबोल सुनवले. दुर्घटना होण्याची वाट पाहू नका ती टळावी यासाठी खबरदारी घ्यावी,उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्या.
सर्वांनी ‘अलर्ट मोड’ वर राहून आपापल्या कार्यालयात बसून न रहाता ‘फील्ड’ वर काम करावे असे आदेश त्यांनी दिले.
महावितरण कंपनी मार्फत भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात येत असून हे काम डिसेंबर, २५, अखेर पूर्ण होईल असे राणे म्हणाले. याबाबतचा आढावा त्यांनी आजच्या बैठकीत घेतला.इथली भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन वीज समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडून’ विशेष पॅकेज’ मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.
राणे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचाही आढावा घेत सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या.