कोकणातील गाबीत समाजासाठी शिबिराचे आयोजन करावे – मंत्री अतुल सावे
मुंबई : ओबीसी महामंडळामार्फत कर्ज पुरवठा, व्याज परतावा व कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ गाबीत समाजातील जास्तीत जास्त नागरिकांना देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करावे, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली गाबीत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, तसेच गाबीत समाज संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री सावे म्हणाले, विविध समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत तसेच मुंबईत प्रामुख्याने गाबीत समाजाचे वास्तव्य आहे. या समाजाच्या सर्वांगीण आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. याबाबत शासनाच्या वतीने सकारात्मक प्रयत्न केले जातील असे सावे म्हणाले.