मद्यधुंद चालकांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे; सदाशिव पेठ येथे घडलेल्या दुर्घटनेवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेतील गजबजलेल्या परिसरात शनिवारी दिनांक ३१ मे २०२५ रोजी एक गंभीर घटना घडली. रस्त्याच्या कडेला चहा पीत उभ्या असलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांवर एक मद्यधुंद कारचालकाने गाडी घातली. या अपघातात १२ विद्यार्थी जखमी झाले असून, यातील ४ विद्यार्थी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेची गंभीर दखल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली.
“ही केवळ अपघाताची नाही, तर नागरी सुरक्षेच्या मर्यादांचा मुद्दा आहे,” अशा शब्दांत त्यांनी चिंता व्यक्त केली.
डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याची मागणी केली. “हडपसर येथून सदाशिव पेठेपर्यंत ४० ते ४५ मिनिटांचा प्रवास करणाऱ्या या मद्यधुंद चालकाला कोणत्याही ठिकाणी अडवून तपासणी का झाली नाही? ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’विरोधात राबवण्यात येणाऱ्या मोहिमेचा काय उपयोग?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“या गाडीचा कोणत्याही सीसीटीव्हीत ठावठिकाणा लागत नसेल, तर हे अत्यंत गंभीर आहे. ही केवळ अपघाताची बाब नाही, तर नागरी सुरक्षेचा मुद्दा आहे,” असेही त्या म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या रुग्णांशी दूरध्वनीवरून संवाद साधला असून, वैद्यकीय आणि कौटुंबिक मदतीसाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
” एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश चिवटे व महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून वैद्यकीय मदत सुरू आहे. काही रुग्णांना घरी सोडण्यात आले असले तरी तीन ते चार जण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या नोकरीसंबंधी अडचणींकडेही मी उपसभापती म्हणून लक्ष देईन,” अशी ग्वाही डॉ. गोऱ्हे यांनी दिली.
या घटनेनंतर पुण्यातील वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “बेशिस्त आणि बेदरकार वाहनचालकांवर तत्काळ नियंत्रण आणले पाहिजे,” असा ठाम संदेश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिला आहे.
डॉ. गोऱ्हे यांच्यासूचनेनुसार रंजना कुलकर्णी, सुदर्शना त्रिगुणाईत, मनीषा परांडे यांनी पीडितांची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली.