महाराष्ट्रमुंबई

लष्करी सामुग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील; अनंत गाडगीळ यांचा गंभीर आरोप

मुंबई : भारतामध्ये हवाईदलाला लागणाऱ्या सामुग्री निर्मितीसाठी कंपन्यांबरोबर करार केले जातात, त्याला वारेमाप प्रसिद्धीही दिली जाते पण प्रत्यक्षात मात्र वर्षानुवर्षे सदर सामुग्री हवाई दलास पुरविलीच जात नाही. ही बाब खुद्द भारताच्या हवाईदल प्रमुखांनीच दिल्लीतील एका कार्यक्रमात नुकतीच स्पष्ट्पणे मांडली

२०२१ साली एक सार्वजनिक उपक्रम व एक खासगी कंपनी सोबत लढाऊ विमान निर्मितीचा करार होऊनही गेल्या ४ वर्षात एकही विमान हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आलेले नाही. ही गंभीर बाब आता उघड झाली आहे. ऑपरेशन सिंदुरच्या यशाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारचे पितळ यामुळे उघडे पडले आहे अशी घणाघती टीका काँग्रेस प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांनी राफेल विमान यांचा दर्जा व खरेदीचा व्यवहार याबाबत काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्यावेळी भाजप कडून राहुलजी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत अशी त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूर दरम्यान राफेल विमान पाडण्यात आले होते की नाही असा काँग्रेसतर्फे प्रश्न विचारला असताना, पाकिस्तानची किती विमान पाडली हे काँग्रेस का नाही विचारत असा उलट प्रश्न करत मूळ प्रश्नाला बगल दिली गेली होती. आजही मोदी सरकारतर्फे अजूनही याबाबत अधिकृत उत्तर देण्यात आलेले नाही. याउलट तिन्ही दलाचे प्रमुख अनिल चौहान यांनीच ही बाब आता मान्य केली. इतकेच नव्हे तर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी तर ५ राफेल पाडली गेल्याचे विधान केले आहे. मग आता अनिल चौहान व स्वामी कुणाची भाषा बोलत आहेत याचा भा ज प खुलासा करणार का ? असा प्रतिप्रश्न गाडगीळ यांनी विचारला आहे.

अमेरिकेच्या एका वृत्तवाहिनीवर भारताच्या राफेल विमानाचे अवशेषही दाखविण्यात आले ते दृश्य खरे आहे की खोटे ( फेक ) याचाही खुलासा मोदी सरकारकडून अजूनही करण्यात आलेला नाही हे ही गाडगीळ यांनी अधोरेखीत केले आहे. आता तर पाश्चिमात्य देशांनी राफेल विमानांबाबत फेरनिरीक्षण सुरु केल्याचे वृत्तही काही युरोप मधील वृतवाहन्यांनी दाखविल्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!