80% बेड रिकामे, तरीही धुलाईचे बिल 56 लाख! सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमधील भ्रष्टाचार उघड
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचा आरोप ठाकरे सेनेने केला आहे
शिवसेना शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचाराची सिंधुदुर्ग दौन्यावर आलेल्या आरोग्य सहसंचालकांसमोर पोलखोल केली . या महाविद्यालयातील 80 टक्के बेड रिकामी आहेत, तरीही रुग्णालयातील कपडे धुण्याचे बिल तब्बल 56 लाख झाले. अशा अनेक प्रकरणांचा माजी आ. वैभव नाईक, माजी आ. राजन तेली, संदेश पारकर, सतीश सावंत सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे यांच्या समोर पाढा वाचला. या सर्व समस्या सोडविण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी सहसंचालकांकडे मागणी केली आहे.
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे मंगळवारी सिंधुदुर्गनगरीत आल्या होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने त्यांची सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयात भेट घेत त्यांच्यासमोर वैद्यकीय महाविद्यालयातील गैर कारभाराचा पाढा वाचला. तसेच याबाबतचे लेखी निवेदन डॉ. सापळे यांना दिले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या हजेरी बुकवर 230 कंत्राटी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
मात्र त्यातील केवळ 150 कमर्चारी प्रत्यक्षात कामावर उपस्थित असतात. इतर 100 कमर्चान्यांच्या खोट्या सह्या मारून त्यांच्या पगाराचे पैसे काढून भ्रष्टाचार केला जात आहे, याकडे वैभव नाईक व पदाधिकान्यांनी डॉ. सापळे यांचे लक्ष वेधले. या महाविद्यालयाशी संलग्न रूग्णालयाची दैनंदिन ओपीडी 100 पेक्षा कमी असताना आणि रुग्णालयातील 80 टक्के बेड रिकामी असताना रुग्णालयातील कपडे धुलाईचे बील तब्बल 56 लाख आले आहे. त्यामुळे हे महाविद्यालय भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचे स्पष्ट होते, असा आरोप शिवसेना शिष्टमंडळाने केला.
सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयात केवळ 4 अध्यापक कार्यरत असून त्यातीलच डॉ. अनंत दवंगे यांना अनुभव नसताना अधिष्ठाता पदावर बसविण्यात आले आहे. त्यामुळे येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याकडे सहसंचालकांचे लक्ष वेधण्यात आले. सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची दयनीय परिस्थिती सुधारा, अशी मागणी या शिष्टमंडळाने डॉ. सापळे यांच्याकडे केली. यावर डॉ. पल्लवी सापळे यांनी महाविद्यालय व रुग्णालयातील त्रुटी व समस्यांचा आढावा घेऊन येत्या 15 दिवसात जनरल, आयसीयू सुविधा रुग्णालयात उपलब्ध करण्याची ग्वाही दिली.