महाराष्ट्रमनोरंजनमुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरीत रंगला ‘सेलिब्रिटी योगा’चा उत्सव; मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत योगदिनानिमित्त विशेष उपक्रम

मुंबई  : योग ही केवळ शारीरिक कसरत नसून ती भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे. याच योगविद्येच्या जागृतीसाठी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘सेलिब्रिटी योगा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, व्यवस्थापक कलागरे संतोष खामकर इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे कलाकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योग सत्राने झाली. या सत्रात उपस्थित कलाकार आणि उपस्थितांनी योगासने करत, आरोग्य, मानसिक शांतता आणि जीवनशैलीमध्ये समतोल साधण्यासाठी नियमित योगाभ्यास करण्याची शपथ घेतली.

सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड आशिष शेलार म्हणाले, “योग हा भारताच्या ऋषी परंपरेचा वारसा आहे. औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी आपण योगाद्वारे निरोगी जीवनशैली स्वीकारली पाहिजे. कलाकार हे समाजाचे आरसाच आहेत. त्यांनी योगप्रसाराचा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचवावा, हीच अपेक्षा आहे.”

या उपक्रमात चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी देखील योगाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “योग हा केवळ व्यायाम नसून जीवनशैली आहे. धकाधकीच्या जीवनात हरवलेलं मानसिक संतुलन पुन्हा मिळवण्यासाठी योग अत्यावश्यक आहे.”

या विशेष योग उपक्रमात मराठी चित्रपट व मालिकांमधील लोकप्रिय चेहरे सहभागी झाले. त्यात सुशांत शेलार, मेघा धाडे, अभिजीत केळकर, अविनाश नारकर, नंदिनी वैद्य, नियती राजवाडे, सुमिरन मोडक, भार्गवी चिरमुले, अनघा भगरे, मिलिंद गवळी, तीतिक्षा तावडे, शर्वानी पिल्ले, रोहिणी निनावे, गीतांजली ठाकरे, कल्पना जगताप, मानसी इंगळे यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!