महाराष्ट्र

राज्य कर्जबाजारी झालं असताना चांदीच्या ताटात जेवणावळी का झोडल्या जात आहेत? – नेते विजय वडेट्टीवार

नागपूर – राज्य एकीकडे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना मुंबईत अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या ताटातून जेवण दिले जाते. राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असताना चांदीच्या ताटात जेवणावळी झोडण्याची आवश्यकता होती का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईत संसदेच्या तसेच विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी शाही भोजनाचा बेत करण्यात आला होता. या शाही भोजनासाठी प्रत्येक सदस्यासाठी पाच हजार रुपयाच्या थाळीचे जेवण दिले. एकीकडे राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही,धानाचा बोनस देणार असे सांगितले ते पैसे सरकारने दिले नाही. विदर्भातील ५८ टक्के शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळाले नाही, बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. एकीकडे आदिवासी आणि समाजकल्याण विभागाचा योजनांना कात्री लावण्यात येत आहे,अंगणवाडी सेविकांना पगार मिळत नाही, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे दिले जात नाही. गरीब, शेतकरी , सामान्य जनतेला त्यांचे हक्काचे पैसे सरकार देत नाही आणि अंदाज समितीच्या बैठकीला येणाऱ्यांसाठी मात्र चांदीच्या ताटात जेवण हे सामान्यांच्या जखमांवर तिखट मीठ चोळणे आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. गरिबांच्या योजनांसाठी पैसे नाही पण इतरांसाठी पैशाची उधळपट्टी करणे हा सरकारचा दुटप्पीपणा आहे अस वडेट्टीवर म्हणाले.

पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याने महिला पोलिसांचा विनयभंग केल्याची घटना धक्कादायक आहे. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना जर महिला पोलिस देखील सुरक्षित नसतील तर याहून मोठे दुर्दैव काय असेल? मुख्यमंत्री ,गृहमंत्री भाजपचे आहेत आणि भाजप पदाधिकारी महिला पोलिसांचा विनयभंग करत असतील तर महिलाना न्याय मिळेल का? महिला पोलिसांवर ही वेळ असेल तर राज्यातील लाडक्या बहिणी वाचवा अस म्हणण्याची वेळ आली आहे, त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था उरली आहे का? अशी टीका विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी केली.

शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध असताना देखील याला कॅबिनेट मध्ये मंजुरी मिळाली. या निर्णयाला काही मंत्र्यांनी विरोध केला पण नुसत विरोध करून काय होणार? मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांना विरोध करायचा आहे तर सरकार मधून बाहेर पडा. लोकांना दाखवण्यासाठी विरोध करायचं आणि सरकार मध्ये राहायचं हा दिखावा आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!