शोध व बचाव पथकांना आपत्ती व्यवस्थापन साहित्याचे वितरण
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत वाटप

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करणे, ज्यामध्ये तात्काळ प्रतिसादाला अत्यंत महत्व आहे. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शोध व बचाव पथकांना अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन साहित्य मिळाल्यामुळे ते अधिक प्रभावीपणे कार्य करु शकणार असल्याचे मत ‘सिंधुरत्न’ योजनेचे अध्यक्ष माजी मंत्री व आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केले. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत आंबोली व सांगेली येथील शोध व बचाव पथकाकरिता साहित्य वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे प्रमुख आर.जे. यादव,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत तसेच आंबोली व सांगेलीतील स्थानिक बचाव पथकातील सदस्य उपस्थित होते.
केसरकर पुढे म्हणाले की, आंबोली परिसरातील नागरिक आपत्तीच्या वेळी मदतीला धावतात. आपत्ती काळात प्राण वाचविण्याचे त्यांचे कार्य अनेक वर्षांपासून सुरू आहे. बचाव पथकाला अत्याधुनिक साहित्य मिळाल्यामुळे त्यांचे कार्य अधिक सुलभ होणार आहे. या साहित्यामध्ये एक चार चाकी वाहन, ड्रोन कॅमेरा, अंडर वॉटर कॅमेरा, वॉकी टॉकी असे साहित्यांचा समावेश आहे असेही ते म्हणाले.
चांदा ते बांदा आणि सिंधुरत्न योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकरी, महिला आणि तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या योजनेअंतर्गत अत्याधुनिक साहित्याचे वाटप झाल्याने अनेक जीव वाचणार आहेत असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केले
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निवासी उप-जिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे यांनी या साहित्यामुळे बचाव पथकाला कशा प्रकारे मदत होणार आहे हे सांगितले. आपल्या जिल्ह्यातील स्थानिक बचाव पथकाला आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे आंबोली व सांगेली येथील पथक या कार्यात निष्णांत आहे. या साहित्यामुळे आता ते अधिक प्रभावीपणे काम करु शकणार असल्याचेही ते म्हणाले.