महाराष्ट्रमुंबईवैद्यकीय

कोविड-१९ आपदेतील देवदूत! . . .मराठी उद्योजक सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. जी एम वारके!

मुंबई : खान्देशातील एका खेडेगावातून आलेला एक युवक संशोधक आणि पुढे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ बनून प्रसिद्ध उद्योजक बनतो. अडथळ्यांची शर्यत पार करीत डॉ गंगाधर वारके नावाचा एक मराठी माणूस स्वतःचा उद्योग उभारतो, अनेकांना रोजगार देतो. सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये भारतामध्ये जे काम करायला कुणी उत्सुक नव्हते ते काम डॉ. वारके यांनी केले,ज्याची दखल विदेशातील कंपन्यांनी घेतली. त्यांच्या विस्तारित कुटुंबाने संशोधनात किंबहुना उद्योगात एकत्र येऊन हाय मीडिया या कंपनीचे मोठे साम्राज्य उभारले…सूक्ष्मजीवशास्त्र त्याचबरोबर उद्योजकीय कौशल्य आणि औद्योगिक क्षेत्रातील योगदान अशा विविध स्तरांवर डॉ. जी. एम. वारके यांचे कार्यचरित्र महत्वपूर्ण आहे..डॉ. वारके यांच्या या कार्यामुळे औद्योगिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात संधींची नवीन दालने खुली झाली आहेत.

मार्च २०२०…कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात हाहाकार माजवला होता.. भारतात या पुर्वी कधीही न घडलेली गोष्ट घडली होती..ती म्हणजे म्हणजे २१ दिवसांसाठी कडकडीत बंद! केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या… त्या देखील भीत भीत.. सर्व माणसे आपापल्या घरात जणू तुरुंगवास अनुभवत होती. काल परवा पर्यंत भेटलेली दिसणारी धडधाकट माणसे बघता बघता अचानक कोरोना ग्रस्त होऊन इस्पितळात भरती होत होती..mahasathichya या विळख्यात कित्येक जीव मृत्यूला कवटाळत होते… अशातच एका दुपारी घाटकोपर मधील हायमिडिया लॅबोरेटरीज च्या कार्यालयातला फोन खणखणतो…”हॅलो हायमिडिया लॅबोरेटरीज? क्या हमारी बात डॉ. जी एम वारके
सर से हो सकती है? दिल्लीतल्या केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यातून बोलणाऱ्या त्या व्यक्तीने आपला परिचय देत आपले बोलणे पुढे सुरू ठेवले.” देश को आज हायमीडिया से सहायता की बहुत उम्मीद है|

रुग्णांच्या घशातील नमुना (swab) गोळा करण्यासाठी लागणाऱ्या व्ही टी एम (व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडीयम) किट्स ट्यूब सहीत मोठ्या प्रमाणात देशाला लागणार होत्या आणि त्या साठी त्यानी डॉ. जी एम वारके यांच्या कंपनीला विनंती केली होती. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून आलेल्या फोनची माहिती आणि एकंदरच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हायमीडिया लॅबोरेटरीचे संस्थापक आणि सीएमडी डॉक्टर गंगाधर मोतीराम तथा जीएम वारके यांनी त्वरित सर्व सुपरवायझर आणि ईतर अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं. अतिरिक्त किट्स चा साठा पुरवण्यासाठी त्यांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल,वेळ, मशीन्स,मनुष्यबळ याची गोळा बेरीज करून काही तासातच उत्पादन युद्ध पातळीवर सुरू केले. सर्व गोष्टींचे नियोजन आणि आखणी पटापट केली उत्पादकांची बोलणी होऊन ऑर्डर्स निघाल्या केंद्र सरकारने सोपवलेलं काम हे एक प्रकारची देशसेवाच आहे हे समजून डॉक्टर जीएम यांनी करोना टाळे बंदीच्या कठीण काळात स्वतः ला आणि कंपनीच्या संपूर्ण कामगार,कर्मचारी वृंदाला झोकून देऊन काम करायला लावले आणि कोरोना विरुद्ध लढण्याच्या देशाच्या लढ्यात मोलाचे योगदान दिले.

मानव जातीवर आलेली ही एक अशी आपदा होती की त्यावर जगभरातील वैद्यकीय क्षेत्राने हात टेकल्यासारखी स्थिती होती, अश्या बिकट प्रसंगी सर्वसामान्य माणसाला पहिल्यांदा महत्ता पटली ती सुक्ष्मजीवशास्त्र आणि त्यात मानवी आरोग्यासाठी औद्योगिक उत्पादने करणा-या संस्था आणि व्यक्तींची! संकटाच्या त्या घडीला अश्या व्यक्ती देशासाठी देवदूतापेक्षा कमी नव्हत्या. सर्वाधिक कोरोनाचा प्रकोप असताना सुदैवाने देशात महाराष्ट्राकडे त्याच्याशी झुंजणारे जिनीअस डॉ जी एम वारके यांच्यासारखे सुक्ष्मजीवशास्त्राचे तज्ज्ञ उद्योजक होते. कोविडच्या या महासाथीमध्ये केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी ‘व्हीटीएम म्हणजे चाचणी नळ्या’ पुरविण्याचे महाशिवधनुष्य ज्यांनी यशस्वीपणे पेलले ते मराठी सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि उद्योजक डॉ गंगाधर मोतिराम ऊर्फ जीएम वारके! या प्रगतिशील मराठी उद्योजक-शास्त्रज्ञांचे कार्यचरित्र हे नव्या पिढीला नव्या प्रेरणास्थानांची ओळख महत्व आणि वेगळेपण अधोरेखीत करते.

वारके यांच्या या व्यक्तिमत्वाच्या घडणीत त्यांचे वडील मोतीराम वारके यांचे मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात १९०५ मध्ये जन्मलेल्या मोतीराम यांचे शिक्षण जेमतेम नवव्या वर्गापर्यंत झाले होते. मात्र त्यांचा जीवनानुभव दांडगा होता, त्यामुळे ते अस्खलित इंग्रजी बोलत असत, राहणीमान मात्र त्या काळाला साजेशे सफेद सदरा धोतर खांद्यावर उपरणे कपाळी गंधाचा टिळा असे संस्कारी होते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप नकळत मुलगा जीएम आणि आता त्यांच्या नातवंडावर देखील पडली आहे. तशीच डॉ जीएम यांच्या आईने कणखर खंबीर स्वभावाने फारसे शिक्षण नसले तरी गृहकृत्यदक्ष चाणाक्ष गृहिणी असल्याने त्यांच्या कष्टाळूपणातून नकळत डॉंक्टरांकडे ते संस्कार येत गेले. त्यातून हे असामान्य व्यक्तिमत्व मग आपल्या अंगभूत गुण आणि मेहनतीने बहरल्याचे पहायला मिळते. तीच गोष्ट भावंडे त्र्यंबक दादा आणि विष्णू यांच्या बाबत होती त्यांचा सहवास आणि सोबत मिळत गेल्याने डॉक्टरांच्या यशाच्या कहाणीला बंधुप्रेमाची झालरही अनायास लाभली असे म्हणावे लागते. त्यानंतर त्यांच्या पत्नी सरोज यांच्याकडूनही त्यांच्या कामाला सकारात्मक पाठिंबा आणि मदत होत राहिल्याने मोठा आधारस्तंभ असल्याचा उल्लेख डॉक्टर करतात. दुधात साखर म्हणजे मेहुणे विजय चौधरी यांच्याकडून १९७४ पासूनच्या वाटचालीत मोलाची साथ मिळाल्याने डॉ.जीएम वारके सरांच्या जीवनाला एखाद्या हि-याला असतात तसे हे पैलूच पडले असे म्हणावेसे वाटते. या शिवाय त्यांनी जे सहकारी जोडले ते मधुकर बो-हाटे, यांनी वारकेम कंपनीमध्ये १९८३ पासून आणि आजच्या हायमीडीया कंपनीपर्यत नेटाने साथ दिली.    

डॉक्टरांच्या व्यक्तीमत्वाची जडण घडण अश्या सुबक माणसांसोबत झाली याशिवाय त्यांचे बालपण देखील गावखेड्यात गेले त्यामुळे त्यांचा जीवनानुभव अधिकच समृध्द होत गेला.प्राथमिक शिक्षणानंतर गावतून शहराकडे आधी माध्यमिक नंतर उच्च शिक्षणासाठी त्यानंतर रोजगारासाठी स्थलांतर हे त्याकाळात आणि आजही मोठ्या प्रमाणात होताना दिसते. त्यातील जो संघर्षाचा आणि नवेकाही शिकून आत्मसात करताना त्यांचा समाजाच्या भल्यासाठी योग्यवेळी नेमका उपयोग करण्याचा दृष्टीकोन त्यातून निर्माण होत गेला.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील पिळोदे बुद्रूक या हजार लोकवस्तीच्या गावच्या बालपणाचे आपले अनुभव सांगताना डॉक्टरांच्या कथनातून आपुलकीचा ओलावा जाणवत राहतो. त्यात मग गावखेड्यातील जातपातीचे आणि गावकी भावकीच्या व्यवहारांचे वर्णन डॉक्टरांच्या जडणघडणीत कसे महत्वाचे आहे याची माहिती देखील त्याच्या विस्तारपूर्वक कथनातून आपल्याला मिळते. महत्वाचे म्हणजे ९५टक्के लेवा पाटीदार समाजाचे हे गाव दारू जुगार आणि मासांहारापासून दूर होते. त्यामुळे भारलेल्या आध्यात्मिक वातावरणात बालपणी मनाची नैतिकदृष्ट्या जी नकळत मशागत होत गेली तीच या भल्या व्यक्तिमत्वाच्या यशामागची महत्वाची बाब ठरली. पिळोद्यातून नंतर माध्यमिक शिक्षणासाठी सांगवी आणि भालोदा या गावात आलेल्या डॉ जी एम वारके यांना नवे मित्र शिक्षक आणि नवे अनुभव मिळाले. जगात पुढे जाताना आपल्यातील अंगभूत व्यक्तित्वाचा विकास सुरू होण्याचा तो काळ देखील ते त्याच निष्ठेने जगले. शाळेनंतर वस्तीगृहातील जगण्याचा अनुभव त्याहून वेगळा होता. शिक्षणासोबतच येथे भेटलेल्या शिक्षकांकडून शिकताना लेझीम पासून क्रिडा स्पर्धा आणि शेतीच्या कामांपर्यत जीवनाचे धडे मिळत गेल्याने डॉक्टरांच्या आतील वेगळ्या व्यक्तिमत्वाची जडण घडण होत होती.

नंतर जळगावला महाविद्यालयीन शिक्षण आणि बहिण शारदाताईकडे राहण्या जेवण्याची सोय झाल्यानंतरही तेथे फार दिवस न राहता बी एस सी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. आणि नंतर मुंबईला उच्च शिक्षणासाठी  डॉ. गंगाधर यांची जीवनगाथा त्यांना घेवून आली. तेथेही मालाड येथे मेहुण्यांच्या भावाकडे राहण्याची सोय झाली. आणि अंधेरीच्या भवन्स महाविद्यालयात शिक्षण सुरू राहिल्याचे ते सांगतात. मात्र नंतर थोड्याच दिवसांत मित्रांसोबत मुंबईतल्या होस्टल लाइफचा अनुभव त्यानी घेतला. त्यातही इंटर सायन्सला नापास झाल्याने जीवनाचा संघर्ष बिकट होत गेला. त्यानंतर केवळ तीन गुणांनी वैद्यकीय शाखेत शिक्षणाचा प्रवेश हुकल्याचे शल्य, मनात डॉक्टर होण्याची बळावत जाणारी जिद्द असा त्या संघर्षाच्या काळाचा एकूण प्रवास राहिला. या सगळ्या संघर्षात केमिस्ट्रीला जाण्याची इच्छा असताना  डॉ गंगाधर मायक्रोबायोलॉजीकडे वळले आणि त्यांच्या जीवनाचा तो टर्निंग पॉईंट ठरला!

पुन्हा सेंट झेवीयर्स मध्ये हे शिक्षण सुरू करण्याचा विचार असताना भवन्स मध्येच पुढील शिक्षण सुरू ठेवावे लागले. ही नियतीच्या खेळातील वरखाली होणारी जगण्याच्या संघर्षाची कहाणी ऐकताना डॉ जी एम वारके या व्यक्तीमत्वाचा नेमका प्रवास आपल्यासमोर उभा राहतो. त्यात मेसच्या वेळा जुळत नसल्याने अर्धपोटी राहून शिकण्यासाठी केलेला संघर्ष, खेळाकडे मनाचा ओढा असताना शिक्षणाच्या साठी त्याकडे पाठ करावी लागणे अश्या तरुण वयात झालेल्या ओढाताणीचा परिणाम या व्यक्तीमत्वाला घडविताना झाला. त्यानंतर डोळ्यांच्या आजारपणामुळे कमी गुण मिळण्याच्या भितीदायक अनुभवातून परिक्षा देणे, आणि एम एस सी चे शिक्षण त्यानंतरही चागल्या गुणानी उत्तिर्ण होणे या संघर्ष जीवनाला वेगळी कलाटणी देणारा होता. मात्र त्यानंतरही जीवनाचा संघर्ष सुरूच होता. सुक्ष्मजीवशास्त्र या विषयात त्यानंतर ‘सुडोमोनाज’ या विषाणूवर नायर हॉस्पिटल येथे संशोधन सुरू झाले. तेथे डॉ देशपांडे यांनी या तरुण संशोधक डॉक्टरच्या मेहनती प्रामाणिक प्रयत्नाचं कौतुक करत नवी संधी दिल्यानंतर कसोटीचा काळ सपल्याचे संकेत मिळत गेले. त्या नंतर डॉ धाला यांचे मार्गदर्शन मिळाले. ‘सायटोगाफा’ या सुक्ष्मजीवांच्या संशोधन प्रकल्पात नंतर अंगभूत गुणांच्या बळावर डॉ गंगाधर यांनी प्राविण्य मिळवले. त्यानंतर नवे संशोधन त्यांच्या नावे लागलेच शिवाय १९६४च्या त्या जून महिन्यात डॉ धाला यांच्याकडून लँबमध्ये पार्ट टाईम कामही मिळाल्याने आर्थिक प्रश्न मार्गी लागले.

एम एस सी संशोधन आणि नोकरी असे करता करता आता नव्या उद्योजकतेचा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर रँलीज कंपनीतील नोकरी आणि पिएचडीची तयारी असा नवा जगण्याचा संघर्ष सुरू झाला. नोकरीच्या जीवनातील चांगले वाईट अनुभव घेत डॉ वारके हे व्यक्तिमत्व घडलं, त्यानंतर जीवनात दोनाचे चार हात झाले आणि आणखी नव्या परिक्षांना सामोरे जाण्याची तयारी झाली. दोन मार्च १९७० रोजी डॉ जीएम आणि सरोज यांची लग्नगाठ बांधली गेली. त्यानंतरचा त्यांचा युनिक फार्मा कंपनीतील व्यवस्थापक ते सर्वेसर्वा होण्याचा प्रवास देखील असाच तावून सुलाखून जाणारा होता. त्यानंतर स्वत:चा हिंदुस्थान डिहायड्रेटेड कल्चर मीडीया या स्वत:च्या उत्पादक कंपनीचा त्यांचा विलक्षण प्रवास देखील अनेक अडचणी आणि त्यातून सामुदायिक प्रयत्नातून केलेली मात असाच होता. घाटकोपरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये ७०टक्के गुजराथी ३० टक्के सिंधी आणि पंजाबी लोकांचे गाळे होते तेथे वारके या मराठी माणसाचा उद्योग मात्र आगळा वेगळा होता. त्यांचा नेमका हा उद्योग काय आहे याची कल्पना तेथील अन्य उद्योजकांना येणे कठीण होते, मात्र त्यांना ते समजावून देताना आपल्या कंपनीच्या मार्केटिंगची उजळणीच नकळत डॉ वारके यांच्याकडून होत गेली हा त्यांचा रंजक अनुभव देखील नव्या तरुण मराठी उद्योजकांनी लक्षात ठेवावा असाच आहे. सुक्ष्मजीवशास्त्र आणि त्या क्षेत्राशी संबंधीत उत्पादने तयार करण्याचा हा व्यवसाय मग असाच वाढता वाढता वाढे. . . या गतीने वाढत राहिला. त्यानंतर फार्मा क्षेत्रातील वारकेम कंपनी स्थापन करण्याचा नवा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला. नव्या उद्योगांचे परवाने आणि जागा मिळवताना आलेले अनुभव सरकारी यंत्रणाचा झापडबंद आडमुठेपणा यातूनही पुन्हा तावूनसुलाखून डॉ वारके यांचा उद्योजकतेचा प्रवास मग बंधु-कुटूंबियांसमवेत अग्रेसर होतच राहिला. त्यानंतर जपान च्या व्यावसाईक भागीदारीतून हाय मीडिया लँब प्रा लि. पर्यंतचा त्यांचा प्रवास विलक्षण अनुभवांच्या कसरतींच्या आणि त्यातूनही यश जिद्दीने खेचून आणायच्या वृत्तीचा कस लावणारा होता.

या सा-या प्रवासात जेंव्हा त्यांना कोविड-१९च्या आणिबाणीच्या काळात पंतप्रधान कार्यालय आणि भारत सरकारकडून लाखो रुग्णांचे स्वाब टेस्ट करण्यासाठी लागणा-या व्हीटीएम ट्यूब्ज तातडीने मोठ्या प्रमाणात तयार करून देण्यासाठी विचारणा झाली तेंव्हा देश सेवेची ही संधी त्यांनी गमावायची नाही असा निर्धार केला आणि पुन्हा ध्येय्यासाठी लढण्याच्या वृत्तीचा परिचय देत त्या भिषण परिस्थीतीतही कच्चा माल मिळवणे त्याची वाहतूक प्रक्रिया आणि वेळेवर सेवा देण्याचा खटा टोप यशस्वीपणे पूर्ण केला. या त्यांच्या कार्यामुळे अनेक वर्षांच्या त्यांच्या संघर्षमय प्रवासाचे सार्थक झाल्याचे जगाने पाहीले. कारण कोविड-१९ सारख्या प्रसंगी आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांना त्या भयावह, साथरोगाची अनुभूती आली. सा-या जगभरात धुमाकूळ घातलेल्या त्या साथ रोगात ज्या वैद्यकीय तयारीची आवश्यकता होती ती प्रकर्षाने समोर आली, आणि ऐरवी या सा-या गोष्टींपासून अनभिज्ञ असलेल्या सरकारी यंत्रणा पासून नागरीकांपर्यत सा-यांना एक जाणिव झाली की, मायक्रोबायोलॉजिस्ट, पँथॉलॉजिस्ट शास्त्रज्ञ, डॉक्टर्स आरोग्यसेविका हे सारे जगासाठी देवदूतच आहेत. सुदैवाने महाराष्ट्राकडे अश्या देवदूतांची कमतरता नव्हती. सुक्ष्मजीवशास्त्रज्ञाच्या- उद्योजकांच्या मायक्रोबायोलॉजीच्या कार्यासाठी कोविड-१९ नंतर ‘BIRAC innovation Award’ सारख्या सन्मानिय पुरस्काराचे मानकरी ठरल्याने या मराठी उद्योजकांच्या कार्याला चारचांद लागले आहेत!

या मराठी उद्योजक शास्त्रज्ञाच्या जीवन प्रवासात कुटूंबातील त्यांचे बंधू त्र्यंबक, विष्णू आणि धर्मपत्नी सरोज यांच्या बद्दलचा हृद्य कृतज्ञतापूर्वक उल्लेख देखील सर्वसामान्य मराठी माणसांच्या भविष्यातील वाटचालीला नकळत दिशा दाखविणारा ठरला आहे. मराठी माणसाने ते देखील सुक्ष्मजीवशास्त्रासारख्या उद्योगक्षेत्रात बहुतांश लोकांच्या आकलना पलिकडची बिकट वाट आपल्या जीवननिष्ठा आणि संघर्षातून वहिवाट करावी हा देखील या यशोगाथेमधील मैलाचा दगडच म्हणावा लागेल! त्यामुळे या मराठी उद्योजकतेच्या प्रवासाचे वेगळेपण अधोरेखीत होते.

चौकट
(प्रसिध्दी पराड.मुख! डॉ. वारके कोरोना काळात हायमीडिया लँबोरेटरीज् प्रा लि. या कंपनीच्या माध्यमांतून त्यांचे कार्य प्रकर्षाने समोर आले तरी डॉ वारके यांना आपल्या या आगळ्या वेगळ्या कार्यासाठी कधी प्रसिध्दी गुणगौरव किंवा मिरवण्याचा विचार शिवला नव्हता. मात्र आरोग्याच्या फार्मा क्षेत्रात नव्याने येवू घातलेल्या तरूणांना आपला जीवन प्रवास प्रेरक ठरावा हा विचार लेखिका आणि पत्रकार अनुराधा परब यांच्याकडून मांडला गेल्यानंतर समाजाच्या मार्गदर्शनाच्या उदात्त हेतूने ‘जीनीयस जेम-डॉ जीएम’ आत्मचरित्र साकारले गेले. पत्रकार अनुराधा परब लिखीत या सुमारे ३५६पृष्ठांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन रोहन प्रकाशन यांनी केले आहे. हे पुस्तक वाचताना आपल्याला एका आगळ्यावेगळ्या सामान्यातून असामान्य ठरलेल्या लोकमान्य व्यक्तीत्वाची ओळख तर होतेच या शिवाय एका उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या जडण घडणीच्या प्रवासाचे आपणच नकळत जीवंत साक्षीदार होवून जातो. एका व्यक्तीच्या चरित्रग्रंथामध्ये आपल्याला त्यांच्या आजूबाजूचा भोवताल आणि त्यात त्यांना भेटलेल्या माणसांची देखील माहिती होते. याशिवाय हे व्यक्तिमत्व घडविताना या सा-या व्यक्तींचा त्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग देखील असल्याचे कृतज्ञ भाव जाणवतात. मराठी नव उद्योजकांना या पुस्तकातून नक्कीच प्रेरणा मिळेल यात शंका नाही.)

बहुमूल्य कार्याचा वारसा नव्या पिढीकडे!
इतकेच नाही २००९ च्या कोंबड्यामुळे आलेल्या बर्ड फ्लूच्या किंवा स्वाईन फ्लूच्या आणिबाणीच्या काळातही व्हीटीएम ट्यूब्ज चा पुरवठा करण्यासाठी  एनआयव्ही म्हणजेच नँशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ने हायमीडिया लँबलाच संपर्क केला होता. याचे कारण महासाथीच्या काळात चाचण्यांसाठी विषाणू सिलबंद करुन एका जागेवरून दुसरीकडे नेण्यासाठी व्हीटीएम ट्यूब्ज देशाला आयात कराव्या लागतात, आपतकालिन स्थितीत त्यांचा पुरवठा करताना आयातशुल्क, वाहतूक खर्च आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन या तीन कसोट्या महत्वाच्या असतात. शिवाय आयात केल्याने त्यांची किंमतही जास्त असते. त्याला पर्याय म्हणून अश्या किटस् देशातच तयार करणे आवश्यक आणि उपयुक्त ठरते. हे शिवधनुष्य हायमीडिया लँब ने स्विकारले आणि केवळ दोनच महिन्यात उच्च गुणवत्तापूर्ण टय़ूब्ज उपलब्ध करून देण्यात आल्या. या कामात डॉ जीएम यांच्या सूनबाई डॉ प्रीती विशाल वारके यांचे कौशल्य आणि मेहनत समोर आली. डॉ जीएम यांच्या बहुमूल्य कार्याचा वारसा असा अलगदपणे दुस-या पिढीनेही आत्मसात केल्याची ही खूणगाठच म्हणायला हवी. त्यानंतर वर्षाकाठी सुमारे पाच लाख ट्यूब्जचा पुरवठा कंपनीने स्वाईन फ्लू ग्रस्तांच्या मदतीने यशस्वीपणे केला.

कोरोनासारख्या महासाथीच्या काळात कर्मचा-यांची काळजी घेत उत्पादन यशस्वीपणे तयार करणे आणि ते मानकांच्या कसोटीवर वेळेत उपलब्ध करून देणे हे कार्य शिवधनुष्य पेलण्यासारखे जिकरीचे होते. मात्र संकटाना नामोहरम करण्याची जिद्द बाळगून डॉ वारके यांच्या कुटूंबासह सहका-यांनी हे काम करून दाखवलं! ही पडद्यामागची कहाणी वाचताना या मराठी उद्योजक-शास्त्रज्ञाच्या जीवनकार्याचे महत्व अधोरेखीत होत रहाते आणि वाचकांच्या मनात कौतुकाच्या कृतज्ञतेच्या भावलहरी छेडून जाते.    

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!