महाराष्ट्रमुंबई

हा केवळ महात्मा गांधींच्या पुतळ्यावरचा हल्ला नाही तर भारताच्या आत्म्यावर घाव घालण्याचा प्रकार आहे: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : पुणे रेल्वे स्थानकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने केलेला हल्ला हा फक्त पुतळ्यावरील नाही, तर हा भारत देशाच्या आत्म्यावरील हल्ला आहे. हल्ला करणारा सुरज शुक्ला हा एक ‘माथेफिरू’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होईल. पण तो संघ आणि भाजप आणि भाजपाने द्वेषाचे खतपाणी घालून वाढवलेल्या विषवल्लीला आलेले फळ आहे. या विषवल्लीचा धोका संपूर्ण देशाला आहे. त्यामुळे याचा बंदोबस्त केला पाहिजे असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

पुणे रेल्वे स्थानक परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने वार करून हल्ला केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, महात्मा गांधी हे केवळ स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे नेते नाहीत, तर ते भारताच्या नैतिक अधिष्ठानाचे शिल्पकार आहेत. गांधीजींनी दिलेली सत्य, अहिंसा, धर्मनिरपेक्षता, आणि सर्वसमावेशकता ही मूल्ये भारतीय लोकशाहीच्या मुळाशी आहेत. सहजीवन आणि धार्मिक सलोखा यावर त्यांचा ठाम विश्वास होता. गांधीविचार फक्त देशातच नाही तर संपूर्ण विश्वात मानले आणि आचरणात आणले जातात. जगातील बहुतांश देशात त्यांचे पुतळे उभारले आहेत. संपूर्ण विश्व गांधी विचारातून प्रेरणा घेते.

संविधान न मानणारे कट्टरवादी विचारसरणीचे काही लोक आणि संघटना मात्र महात्मा गांधीजींचा द्वेष करतात. याच द्वेषातून महात्मा गांधीजींची हत्या करण्यात आली होती. २०१४ साली केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून या अपप्रवृत्तींना मोठ्या प्रमाणात बळ आणि पाठिंबा मिळू लागला. सरकारी छत्रछायेत या टोळक्यांनी महात्मा गांधीबद्दल अपप्रचार आणि गोडसेंचे उदात्तीकरण सुरु केले. यातून सूरज शुक्लासारखे अनेक विखारी तयार झाले आहेत. यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. या शुल्कावर UAPA अंतर्गत कारवाई करावी जेणेकरून ही पिलावळ पुन्हा अशी हिंमत करणार नाही. गांधीजींची हत्या करून यांना गांधीविचार संपवता आला नाही पुतळ्यावर कोयत्याने वार करून गांधीविचार संपणार नाही. गोडसेविचार हा विनाशाचा मार्ग आहे, गांधीविचार हीच देशाची दिशा आणि सत्य आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!