शुभांशू शुक्लांचा अंतराळातून पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू…
आजही, भारत सारे जहाँ से अच्छा दिसतो": शुभांशू शुक्ला यांचा संदेश…

वृत्त संस्था : अंतराळातून भारत महत्त्वाकांक्षेने भरलेला, निर्भय, आत्मविश्वासाने भरलेला आणि अभिमानाने भरलेला दिसतो, असे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी रविवारी सांगितले होते.
“आजही, भारत वरून ‘सारे जहाँ से अच्छा’ दिसतो,” असे शुक्ला यांनी १९८४ मध्ये भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या प्रतिष्ठित शब्दां चा दाखला देत म्हटले आहे.
“मला ते जवळजवळ जादूसारखे वाटते… माझ्यासाठी हा एक विलक्षण प्रवास होता,” शुभांशू शुक्ला यांनी २६ जूनपासून सुरू झालेल्या आयएसएसमधील त्यांच्या वास्तव्याबद्दल सांगितले.
भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे 17 दिवसांच्या अविस्मरणीय अंतराळ सफरीनंतर आज, 14 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4:35 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून (ISS) पृथ्वीच्या दिशेने परतीस निघाले आहेत. स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये बसलेले चारही अंतराळवीर आता पृथ्वीवर परतण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत.
अंदाजे 23 तासांच्या प्रवासानंतर 15 जुलै रोजी दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ त्यांच्या स्पेसक्राफ्टचे स्प्लॅशडाऊन होणार आहे.
ही मोहीम केवळ भारतासाठी नव्हे, तर जागतिक पातळीवरही महत्त्वाची ठरली आहे. शुभांशु शुक्ला हे ISS वर पोहोचणारे पहिले भारतीय आहेत, तर 41 वर्षांनंतर अंतराळात गेलेले दुसरे भारतीय ठरले आहेत. त्यांनी भारताच्या वतीने एक्सियम स्पेस, नासा व स्पेसएक्स यांच्या संयुक्त ‘एक्सियम-4’ या खासगी मिशनमध्ये सहभाग घेतला. भारत सरकारने या मिशनसाठी 548 कोटी रुपये खर्च केले आहेत.
मिशन दरम्यान शुभांशु यांनी 60 हून अधिक वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भाग घेतला. भारताच्या सात प्रयोगांचा त्यात समावेश होता, जसे की अंतराळात मेथी-मूग उगम, हाडांवरील प्रभाव आणि सूक्ष्मजीव संशोधन. त्यांनी ISS मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रोचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध शहरांतील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत STEM शिक्षणावरील जागरूकतेला गती दिली.
13 जुलै रोजी फेअरवेल सेरेमनीदरम्यान शुभांशु यांनी “भारत आजही सारे जहां से अच्छा” या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी अंतराळातून घेतलेल्या पृथ्वीच्या खास छायाचित्रांनी देखील जगाचे लक्ष वेधले आहे.
शुभांशु यांचा अनुभव भारताच्या आगामी गगनयान मोहिमेसाठी मोलाचा ठरेल. भारताचे हे पहिले मानवी अंतराळ मिशन 2027 मध्ये अपेक्षित असून त्यासाठी शुभांशु यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासामुळे भारताची अंतराळ संशोधनातील वाटचाल आणखी दृढ होणार आहे.