मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेना साद;सत्तेत या!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची खुली ऑफर दिली आहे. अंबादास दानवे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपला, त्यानिमित्तानं निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी बोलताना फडणवीसांनी ही ऑफर दिली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी याला उत्तर दिले आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ऑफरे देताना म्हटले की, ‘उद्धवजी 2029 पर्यत काहीही स्कोप नाही, आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा, स्कोप आहे. ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या या ऑफरला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या ऑफरबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सभागृहात या गोष्टी खेळीमेळीने झाल्यात आणि त्या गोष्टी खेळीमेळीनेच घ्यायला हव्यात.’ याचाच अर्थ देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत सहभागी होण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी धुडकावून लावली आहे.
देवेंद्र फडणवीसांकडून दानवेंच कौतुक
अंबादास दानवेंना निरोप देताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटले की, ‘अंबादास दानवे हे मूळचे भाजपच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते. हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारे आणि कट्टर सावरकरवादी कार्यकर्ते म्हणजे दानवे. पण जागावाटपात विधानपरिषदेची जागा शिवसेनेला गेली. मग दानवेंना शिवसेनेत जावं लागलं.’






