महाराष्ट्रमुंबई

मस्त्य विभाग मरोळ फिश मार्केटचा पुनर्विकास करणार, महापालिका आपला हिस्सा मस्त्य विभागाला देणार – भूषण गगराणी

मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारातील विविध मार्केटच्या पुनर्विकासाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असून यात मरोळ फिश मार्केट, नवलकर मार्केट, दत्ताजी साळवी मंडई, निर्मलाताई रागिणवार मंडईच्या पुनर्विकासाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व खासदार रविंद्र वायकर यांच्या संयुक्त बैठकीत दिले. मरोळ फिश मार्केटचा पुनर्विकास मस्त्य विभागातर्फे करण्यात येणार असून त्यासाठी मुंबई महापालिका आपल्या हिस्स्याची रक्कम मस्त्य विभागाला देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
२७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी सोमवार १४ जुलै २०२५ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधिमंडळातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला नगर विकास विभागाचे प्रधान सचिव आसीम गुप्ता, म्हाडाचे उपमुख्य अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल, बीएमसीचे आयुक्त भूषण गगराणी, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, अतिरिक्त सीपी मीना, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, विभाग प्रमुख अल्ताब पेवेकर, ज्ञानेश्वर सावंत तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या लोकसभा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या विविध विधानसभा क्षेत्रात मुंबई महानगरपालिकेची मार्केट आहेत. यात मरोळ फिश मार्केट, नवलकर मार्केट, निर्मलाताई रागिनवार, दत्ताजी साळवी मार्केट, जे.व्ही.पी.डी मार्केट, वर्सोवा मार्केट आदी मार्केटचा समवेश आहे. यातील अनेक मार्केट जुनी असल्याने त्याच्या दुरवस्थेत वाढ झाली आहे. तर काही मार्केट प्लॉटच्या विकासासाबाबत अद्याप कुठलाच निर्णय महापालिकेने घेतलेला नाही. मरोळ फिश मार्केटच्या वाढत्या दुरावस्थेमुळे याचा पुनर्विकास करण्यात यावा अशी मागणी येथे मासे विक्रेते यांनी केली होती. त्यानुसार याचा पुनर्विकासत यावा अशी मागणी खासदार वायकर यांनी बैठकीत केली. याला उत्तर देताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी याचा पुनर्विकास मस्त्य विभागातर्फे करण्यात येणार असून त्यासाठी महापालिका आपल्या हिस्स्याची रक्कम मस्त्य विभागाला देणार असल्याची माहिती दिली. तर नवलकर मार्केटच्या पुनर्विकासाचा आराखडा मंजूर करण्यात आला असून लवकरच त्याचे टेंडर महानगर पालिका काढणार असल्याची माहितीही त्यांनी उपमुख्यमंत्री व खासदार यांना दिली.

वनविभागातील रहिवाश्यांना मुलभूत सोई सुविधा मिळणार:
गेल्या अनेक वर्षापासून वनविभागात राहणारी जनता हि पण माणसे आहेत. त्यांना मुलभूत सुविधेपासून वंचित न ठेवता मुलभूत सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी खासदार वायकर यांनी बैठकीत केली. त्यानुसार मुलभूत सुविधा देण्याची जबाबदारी हि महानगरपालिकेची असल्याने वनविभागात रहाणाऱ्या रहिवाश्यांना पाणी, रस्ते, शौचालय आदी मुलभूत सुविधा द्या त अशा सूचना उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना दिल्या.

आरेतील अंतर्गत रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय होणार :
आरेमध्ये २७ आदिवासी पाडे असून अन्य लोकवस्ती हि आहे. याठिकाणी जंगली प्राण्यांचा वावर ही मोठ्याप्रमाणात असतो. या प्राण्यांनी मानवी वस्तीत हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे आरेतील ४५ कि.मीच्या अंतर्गत रस्त्यांवर स्ट्रीटलाईटची सुविधा करण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!