सिंधुदुर्गमध्ये 25 वर्षांनी आढळल्या तीन दुर्मीळ वनस्पती; महाराष्ट्रात या प्रजातीची प्रथमच नोंद

सिंधुदुर्ग : आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. विजय पैठणे आणि त्यांच्या दोन विद्यार्थिनींनी चिकट मत्स्याक्षी, भुईचाफा, ‘गाठी तुळस’ (रान तुळस) अशा तीन दुर्मीळ वनस्पती शोधून त्यांची वनस्पती संशोधन संस्थांकडे नोंद केली आहे. २५ वर्षांनंतर या वनस्पती आढळून आल्याने जिल्ह्याच्या वनसंपदेत मोठी भर पडली आहे.
नैसर्गिक साधनसंपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १२०० हून अधिक वनस्पतींची नोंद झालेली आहे. आता त्यामध्ये नव्याने तीन दुर्मीळ वनस्पतीची भर पडणार आहे. येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. विजय पैठणे तसेच महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनी सारिका बाणे व योगेश्री केळकर यांनी भुईचाफा चिकट मत्स्याक्षी आणि गाठी तुळस’ (रान तुळस) या तीन दुर्मीळ वनस्पती शोधल्या आहेत. २०१५ पासून विविध वनस्पतींचा शोध, त्याची चिकित्सा सुरू होती. त्यातून या तीन वनस्पतीचा शोध लागला आहे.