महाराष्ट्रमुंबई

गृहमंत्री अमित शाहांची संसदेत खोटी माहिती, संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी गप्प का? चीनचे नाव घेण्याची हिम्मत का होत नाही ? : अतुल लोंढे

मुंबई : ऑपरेशन सिंदूर विषयी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेहमीप्रमाणे खोटे बोलले. काँग्रेस सरकार असताना अतिरेकी हल्ले झाले हे सांगताना भाजपा सरकारच्या वेळी झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख त्यांनी केला नाही. वाजपेयी सरकार असताना संसदेवर हल्ला झाला, अक्षरधाम हल्ला झाला आणि कंदहार विमान अपहरण प्रकरणी तर मंत्री जसवंत सिंह हे सुरक्षेसह पाच कुख्यात अतिरेक्यांना कंदहारला सोडून आले. पाकिस्तानी आयएसआयला पठाणकोटला बोलवण्याचे पापही भाजपा सरकारनेच केले. खरे पाहत देशाशी गद्दारी करण्याचे काम भाजपा सरकारनेच केले आहे असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

अमित शाह यांच्या निवेदनाचा समाचार घेत अतुल लोंढे म्हणाले की, अमित शाह यांनी काँग्रेस सरकारवर खोटे आरोप केले, काँग्रेस सरकार असताना अतिरेक्यांचे मृतदेह परत दिलेले नाहीत. अफजल गुरु व कसाबला फाशी दिली व जेलमध्येच गाडले. या उलट १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला २०१५ साली फाशी दिल्यानंतर त्याचा मृतदेह मेमनच्या कुटुंबियांना देण्यात आला याची माहिती अमित शाह यांनी घ्यावी. हुर्रियत काँन्फरन्सबरोबर वाजपेयी सरकारनेच सर्वात जास्त चर्चा केली आहे पण अमित शाह मात्र काँग्रेसवर आरोप करत आहेत. डॉ. मनमोहनसिंह यांचा जन्म पाकिस्तानातील, ते १० वर्षे पंतप्रधान होते पण ते पाकिस्तानला गेले नाहीत पण नरेंद्र मोदी आमंत्रण नसताना पाकिस्तानला जाऊन नवाज शरिफ यांची बिर्याणी खाऊन आले. नरेंद्र मोदींनी शपथविधीलाही नवाज शरिफ यांना आमंत्रण दिले होते, याची आठवण लोंढे यांनी करून दिली.

ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तान फक्त पुढे होता खरा सुत्रधार तर चीन होता, तोच सर्व करत होता असे लष्कराचे उपप्रमुख राहुल के. सिंग यांनी सांगितले आहे. पण अमित शाह यांनी चीनचे नाव घेण्याची हिम्मत दाखवली नाही. संयुक्त राष्ट्राच्या मुद्द्यावर बोलतानाही अमित शाह खोटे बोलले. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना ही १९४५ साली झाली व अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन व रशिया हे त्याचे सदस्य होते, त्यावेळी भारत स्वतंत्र झालेला नव्हता असेही अतुल लोंढे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!