मागील ५ वर्षात ६६२ बांगलादेशी घुसखोर नागरिक हद्दपार – खासदार रविंद्र वायकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला पोलीस विभागाकडून उत्तर

मुंबई : मुंबई तसेच महाराष्ट्रात वाढत्या बांगलादेशी घुसखोर नागरिकांचे वाढते प्रमाण हि चिंतेची बाब असल्याने मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याप्रश्नी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी प्रश्न उपस्थित करताच मागील ५ वर्षात एकूण ६६२ बांगलादेशी घुसखोर नागरिकांना हद्दपार करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात तसेच मुंबईमध्ये बांगलादेशी रोहीग्यांनी बनावटदस्त ऐवजाच्या आधारे मोठ्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले होते. सन २०२४ मध्ये २,१४,३०५ अर्ज प्राप्त झाले त्यामधून १,२९,९०६ जन्म प्रमाणपत्र जारी करण्यात आली आहेत, अशी माहिती प्राप्त होत असल्याने देश व राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची तसेच यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री याना पत्रही पाठवण्यात आले.
त्यामुळे बांगलादेशी लोकांचे पोलिसांमार्फत सर्वेक्षण मारण्यात यावे, जेणे करून ड्रग तस्करी/ अनैतिक कामे कमी होण्यास मदत होईल, असा मुद्दा मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी मुंबई उपनगर जिल्ह्या नयोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला होता.
या मुद्याला उत्तर देताना पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी, बृहन्मुंबई हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व पथक तसेच गुन्हे शाखा, ए.टी.एस, आय शाखा, वि.शा १, गु.अ.वि, मुंबई यांच्यामार्फत अनधिकृत रित्या वास्तव्य करणाऱ्या घुसखोर बांगलादेशी नागरीकांन विरुद्ध कारवाई करण्यात येत असून, या कारवाई दरम्यान संशयीत घुसखोर मिळून आल्यास त्यांच्या विरुद्ध हद्दपाराची कारवाई करण्यात येते. मागील ५ वर्षात एकूण ६६२ बांगलादेशी घुसखोर नागरिकांना हद्दपार करण्यात आलेले असल्याचे पोलीस उप आयुक्त कांबळे यांनी लेखी उत्तराद्वारे खासदार वायकर यांना कळवले आहे.