गणेशोत्सवाची गोड सुरुवात! तेजस आणि वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोदक वाटप

मुंबईः गणेशोत्सव अवघ्या चार आठवड्यांवर आला असून यंदा २७ ऑगस्ट रोजी बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला गोड आठवणी देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष उपक्रम आखला आहे.
भारतीय रेल्वेने कोकणात जाणान्या प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्यांचे नियोजन आधीच केले असून, आता प्रवास अधिक आनंददायी करण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने एक गोड निर्णय घेतला आहे. तेजस आणि वंदे भारत एक्सप्रेस या प्रीमियम गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांना उकडीचे मोदक वाटप करण्यात येणार आहे.
गणरायाच्या आगमनाची ओढ आणि कोकणातील पारंपरिक उकडीच्या मोदकांची चव यांचा संगम या निर्णयातून साधला गेला आहे. प्रवाशांना वाटेतच ‘प्रसाद’ स्वरूपात मोदक मिळाल्याने त्यांच्या आनंदात भर पडणार आहे. त्याचप्रमाणे प्रादेशिक खाद्यसंस्कृतीला चालना देण्याचाही उद्देश या उपक्रमामागे असल्याचे IRCTC कडून सांगण्यात आले आहे.
मोदक हा केवळ खाद्यपदार्थ नसून कोकणातील श्रद्धेचा, प्रेमाचा आणि परंपरेचा भाग आहे. त्यामुळे रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत होत असून, प्रवासातही गणेशोत्सवाची छाया अनुभवता येणार आहे.