राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत, ही शिवसैनिकांची इच्छा – मंत्री उदय सामंत

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच महायुती सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत, ही शिवसैनिकांची इच्छा आहे. तसेच नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दादा भुसेंना संधी द्यावी, अशी आपली इच्छा असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र आढावा बैठकीनंतर सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक आढावा घेतला जात असून, त्यात प्राथमिक व सक्रिय सभासद नोंदणी, गटप्रमुखांची कामगिरी तसेच प्रत्येक शहर व जिल्ह्यातील पक्षाची स्थिती याविषयी माहिती घेतली जात आहे. हा आढावा घेताना पक्षाचे कामकाज कार्यक्षमपणे न करणान्यांवर वेगळी जबाबदारी दिली जाणार असून, तरुण कार्यकर्त्यांना चांगली संधी दिली जाणार आहे. बैठकीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी विराजमान व्हावे अशी भावना व्यक्त केली असून, त्यात वावगे काय, असाही प्रश्न सामंत यांनी केला.