मुंबईकोंकणमहाराष्ट्र

कोकणभूमीचं बदलतं सत्य, विकासाआड काँक्रिटीकरणाचं जाळं! या समस्यांवर तिरकस भाष्य करणारा ‘आदिशेष’ !!

मुंबईः समामाजातलं बदलणारं वास्तव पडद्यावर जिवंत करण्याची ताकद ज्यांच्या हातात आहे, असे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रमेश मोरे आता एका नव्या आणि वेगळ्या कथा प्रवासाला घेऊन येत आहेत. ‘आदिशेष’ असं या सिनेमाचं नाव असून अभिनेते अरुण नलावडे यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शनासोबतच कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन रमेश मोरे यांनीच केलं आहे. अलीकडेच या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले.

‘विकासाच्या नावाखाली काँक्रिटीकरणाचं जाळं या सिनेमाविषयी बोलताना दिग्दर्शक रमेश मोरे यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘विकासाच्या नावाखाली काँक्रिटीकरणाचं जाळं मोठं होत चाललं आहे. शहरांमागोमाग आता गावंही काँक्रिटीकरणाच्या विळख्यात अडकत चालली आहेत. त्यामुळे जणू निसर्गाचा जिवंतपणाच हरवत चालला आहे. माणूस, नाती, राहणीमान सारं काही व्यावहारिक बनलंय. परंपराही फॅशनसारख्या पाळल्या जाऊ लागल्या आहेत. ‘आदिशेष’ हा सिनेमा याच सर्व गोष्टींवर तिरकस भाष्य करतो आणि समाजाला आरसा दाखवण्याचं काम करतो. कोकणच्या निसर्गरम्य भूमीच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते’.

‘समाजाभिमुख असा हा सिनेमा’
सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे असं म्हणाले की, ‘दिग्दर्शक रमेश मोरेच्या चित्रपटात काम करणं म्हणजे फक्त अभिनय नव्हे, तर त्याच्या विचारसरणीचा भाग होण्यासारखं असतं. त्याच्या प्रत्येक कथेत समाजाला काहीतरी सांगण्याचा उद्देश असतो. ‘आदिशेष’ हीसुद्धा तशीच कथा आहे. निसर्ग, नाती आणि माणुसकीच्या बदलत्या स्वरूपावर ती तिरकस भाष्य करते. रमेश कलाकारांवर विश्वास ठेवतो आणि त्यांना कथेशी एकरूप करू घेतो, ही त्याची खासियत आहे. हा सिनेमा केवळ मनोरंजनच करणार नाही, तर विचारांना चालनासुद्धा देईल. समाजाभिमुख असा हा सिनेमा आहे.’

दरम्यान कोकणातल्या संगमेश्वरमधील कडवाई, तुरळ, हारेकर वाडी या ठिकाणी नुकतंच ‘आदिशेष’ या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं. सिनेमात अरुण नलावडे यांच्यासह प्रणव रावराणे, आराधना देशपांडे, वैशाली भोसले असे हरहुन्नरी कलाकार आहेत. प्राध्यापक दत्तात्रय सांगोरे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!