महाराष्ट्र

ज्ञानेश्वरीतील विश्वात्मक विचार जगाला मार्गदर्शक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. १५ : संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे. ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे मूळ असून तो जगाला मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती दिनानिमित्त आयोजित संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, ह.भ.प. मारुती महाराज कुरेकर, ह.भ.प. नारायण महाराज जाधव, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, बापूसाहेब पठारे, महेश लांडगे, बाबाजी काळे,देवेंद्र पोटे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, आपल्या संस्कृतीतील प्राचीन मूल्ये जपण्याचे श्रेय वारकरी संप्रदायाला आहे. ही मूल्य विचारांची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नेल्याने आम्ही परकीय आक्रमण होत असताना राजकीय गुलामगिरी स्वीकारली, पण वैचारिक गुलामगिरी स्वीकारली नाही. वारकरी परंपरेने आणि संतांनी जात, धर्म भेदामुळे गुलामगिरीत जाणाऱ्या समाजात ऐक्य निर्माण करण्याचे कार्य केले. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हीच शिकवण दिली आहे, 21 वर्षांच्या जीवनात त्यांनी दिलेला विचार आपल्याला शतकानुशतके मार्ग दाखविणारा आहे. म्हणूनच समाधी मंदिरात आल्यावर चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते, असे त्यांनी सांगितले. विचार आणि तत्वज्ञानाचा निर्मळ प्रवाह असलेली भारतीय सभ्यता सर्वात जुनी सभ्यता आहे हे जगाने मान्य केले असल्याचेही ते म्हणाले.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अर्जुनाला कर्म मार्ग दाखविण्यासाठी भगवान योगेश्वराने गीता सांगितली, गीतेचे मराठीत विवेचन करणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कळस आजच्या दिवशी चढविला जाणे हा एक सुवर्णयोग आहे. भक्तांनी दान नव्हे तर समर्पण केल्याने हा सुवर्ण कलश चढविला गेला. सुवर्ण कलशासोबत महादजी शिंदे यांनी उभारलेल्या महाद्वाराचा जीर्णोद्धार केल्याने त्याला मूळ स्वरूप प्राप्त होईल आणि मंदिर परिसराच्या पावित्र्यात भर पडेल.

भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान हे जगातले सर्वोत्तम तत्त्वज्ञान असून ते जगात स्वीकारले जात आहे. माऊलींनी 9 हजार ओव्यांच्या माध्यमातून मांडलेले हे ज्ञान ऑडिओ बुकच्या माध्यमातून सर्व भाषेत उपलब्ध होणार असल्याने ते जगभरात पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

लहान ऑडिओ क्लिपद्वारे ज्ञानेश्वरीचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवा-एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री  शिंदे म्हणाले, मंदिराच्या महाद्वारातून भक्त माऊलीचा गजर करीत पुढे जातात. ही वारकरी परंपरा फार मोठी आहे आणि ती पुढे नेत असताना समाधी मंदिरावर सुवर्ण कलश चढविला जाणे ही महत्त्वाची घटना आहे. भाविकांच्या योगदानामुळे या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य सर्वांनाच मिळाले. वारकऱ्यांसाठी ज्ञानोबा हा श्वास आणि आळंदी ही काशी आहे, अलंकापुरी म्हणून परिचित असलेल्या आळंदीला मराठीसाठी आणि भागवत धर्मासाठी महत्त्वाचे स्थान आहे. आज नव्या संकेतस्थळाच्या माध्यमातून भागवत धर्मातील विचार प्रसाराची ही परंपरा पुढे नेण्यासाठी ज्ञानेश्वरी ऑडिओ बुकचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या दोन ते तीन मिनिटांच्या ऑडिओ क्लिप तयार करून पुढच्या पिढीपर्यंत हा विचार अधिक प्रभावीपणे पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री  शिंदे म्हणाले, देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. वारकरी संप्रदाय समाजाला सन्मार्ग दाखविणारी मोठी शक्ती आहे. त्यामुळे आपली संस्कृती कोणीही नष्ट करू शकला नाही. संत महात्मे अशावेळी सुविचार समाजात रुजवित होते. संत ज्ञानेश्वरांनी कर्म, ज्ञान, सदाचार, नीती, भक्तीची शिकवण दिली, त्यातून समाजाला विशालदृष्टी मिळाली. शेकडो वर्षानंतर आजही माऊली अखंड आणि पवित्र अग्निहोत्राप्रमाणे जगाला ऊर्जा आणि प्रेरणा देत आहेत. त्यामुळे या महाद्वारातून प्रवेश करताना मीपण, अहंकार गळून पडेल सात्विकतेचा अनुभव भक्तांना मिळेल, असे त्यांनी सांगितले. आळंदी विकास आराखड्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
योगी निरंजननाथ यांनी प्रस्ताविकात सोहळ्याची माहिती दिली. श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात सौर ऊर्जेचा उपयोग सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णकलश पूजन आणि श्री ज्ञानेश्वरी(सार्थ) ऑडिओ बुक विविध भाषेत उपलब्ध असलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या संकेतस्थळाचे उद्धाटन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत भाविकांच्या वर्गणीतून तयार करण्यात आलेला हा 22 किलोचा सुवर्ण कलश समाधी मंदिरावर चढविण्यात आला. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते महाद्वार जीर्णोद्धार कार्यारंभ पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सुवर्णकलश आणि महाद्वारासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथ, ॲड. रोहणी पवार, चैतन्य कबीर, पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!